मोफत नेत्रोपचारातून लाखो रुग्णांना मिळाली नवदृष्टी
370 नागरिकांची नेत्र तपासणी; 48 रुग्णांवर मोतीबिंदू व काचबिंदू शस्त्रक्रिया होणार
‘स्व. आ. शिवाजीराव कर्डिले नेत्रालय’ उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देणार -आमदार अक्षय कर्डिले
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला ज्येष्ठ नागरिकांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नेत्रदान व अवयवदानाबाबत जनजागृती करतानाच नागरिकांच्या विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे, मागील 35 वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या या सामाजिक उपक्रमातून आतापर्यंत तब्बल 3 लाख 97 हजार 447 रुग्णांवर मोफत नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्या असून हजारो कुटुंबांच्या जीवनात नव्या आशेचा प्रकाश निर्माण करण्यात आला.
नागरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिर परिसरात आयोजित शिबिराचे उद्घाटन आमदार अक्षय कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा नेते संदिप कर्डिले, महेश झोडगे, दत्ता तापकिरे, फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, माजी सरपंच राम पानमळकर, उपसरपंच सोनू भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य मयुर पाखरे, ग्रामविस्तार अधिकारी नेताजी भाबड, कामगार तलाठी आदिनाथ निकम, डॉ. विशाल घंगाळे, राजेंद्र बोरुडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार अक्षय कर्डिले यांनी फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, सामाजिक बांधिलकी जपत गेली अनेक वर्षे संस्था आरोग्यसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचाही या सामाजिक कार्याशी जवळचा संबंध होता. त्यांच्या हस्ते अनेक आरोग्य शिबिरांचे उद्घाटन झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱ्या ‘स्व. आ. शिवाजीराव कर्डिले नेत्रालय’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे गरजू, गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना अत्याधुनिक आणि मोफत नेत्रोपचार उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस प्रेरणादायी आहे. या प्रकल्पासाठी बुऱ्हाणनगर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी प्रकल्पाविषयी माहिती देताना सांगितले की, तपोवन रोड परिसरात प्रस्तावित असलेल्या ‘स्व. आ. शिवाजीराव कर्डिले नेत्रालय’चे आराखडे व डिझाइन अंतिम टप्प्यात असून आवश्यक प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. लोकवर्गणी, समाजातील दानशूर व्यक्तींचे योगदान आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सहभागातून हा महत्त्वपूर्ण प्रकल्प साकारला जाणार आहे. भविष्यात या नेत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील गरजू रुग्णांना दर्जेदार, अत्याधुनिक आणि पूर्णतः मोफत नेत्रोपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली 370 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर 48 रुग्णांवर पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू व काचबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. तसेच गरजू नागरिकांना अल्पदरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसाठी रक्तदाब, मधुमेह आणि इतर आरोग्य तपासण्यांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविस्तार अधिकारी नेताजी भाबड यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत माजी सरपंच राम पानमळकर यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गौरव बोरुडे, सौरभ बोरुडे, बाबासाहेब धीवर, राजेंद्र बोरुडे, रवी बालटे, ओम बोरुडे, जय बोरुडे, जगदिश बोरुडे यांच्यासह बुधराणी हॉस्पिटलचे सचिन पगार, विशाल भिंगारदिवे, फिनिक्स फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपसरपंच सोनू भुजबळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

