विविध प्रकारच्या 1400 रोपांची केली जाणार लागवड
वृक्षरोपण व संवर्धन चळवळ यशस्वी होण्यासाठी प्रत्येक नागरिकांच्या सहभागाची गरज -अफसर पठाण
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने भोयरे पठार ते पिंपळगाव कौडा रस्त्याच्या 1400 मीटर अंतरावर रस्ता दुतर्फा 1400 वृक्ष लागवडीच्या कामाचा शुभारंभ वृक्षरोपणाने करण्यात आला. यावेळी सरपंच बाबा टकले, उपसरपंच राजेश बोरकर, ग्रामपंचायत सदस्य कृष्णाकांत टकले, वनरक्षक अफसर पठाण, सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरण प्रेमी पै. नाना डोंगरे, ग्राम रोजगार सेवक अमोल टकले, लहानू टकले, संदीप उरमुडे, शंकर मुठे आदींसह ग्रामस्थ व लागवडीचे काम करणाऱ्या गावातील महिला उपस्थित होत्या.
वनरक्षक अफसर पठाण म्हणाले की, गावोगावी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने होत असलेल्या रस्ता दुतर्फा वृक्षरोपणाने परिसराचे सौंदर्य खुलणार असून, जमिनीची धूप थांबून पर्यावरण संवर्धन होणार आहे. वृक्षरोपण व संवर्धन चळवळ यशस्वी होण्यासाठी प्रत्येक नागरिकांच्या सहभागाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
पै. नाना डोंगरे यांनी प्रत्येक गावात वृक्षरोपण व संवर्धन चळवळ बहरल्यास पर्यावरणाचे प्रश्न सुटणार आहे. ढासाळलेले निसर्गाचे समतोल वृक्षरोपणाने साधले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भोयरे पठार ते पिंपळगाव कौडा रस्त्याच्या दुतर्फा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वन क्षेत्रपाल हेमंत उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चौदाशे रोपांची लागवड करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने करंज, सीताफळ, चिंच, आंबा, आवळा, कांचन, लक्ष्मीतरु अशा विविध प्रजातींची रोपे लागवड करून रस्त्याचे सुशोभीकरण होणार आहे. या वृक्षाच्या संवर्धनासाठी सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून तीन वर्षे देखभाल केली जाणार आहे.