• Fri. Sep 19th, 2025

शहरात चित्रकला प्रशिक्षण वर्गाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ByMirror

May 16, 2023

समृद्धी महिला बहुउद्देशीय संस्था व नेहरू युवा केंद्राचा उपक्रम

विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्राकडे वळावे -अ‍ॅड. महेश शिंदे

अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्राकडे वळावे. कोणतेही क्षेत्र लहान अथवा मोठे नसते. त्या क्षेत्रात आपल्या कौशल्याने मोठे व्हायचे असते. ध्येय, चिकाटी व सातत्य ठेवल्यास एखाद्या कलेत प्रावीण मिळते. विद्यार्थ्यांनी आपली आवड व छंद जोपासला पाहिजे. त्याला योग्य दिशा व मार्गदर्शन मिळाल्यास निश्‍चित यश मिळत असल्याचे प्रतिपादन जय युवा अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे यांनी केले.


समृद्धी महिला बहुउद्देशीय संस्था व नेहरू युवा केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भुतकरवाडी येथे चित्रकला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनाप्रसंगी अ‍ॅड. शिंदे बोलत होते. याप्रसंगी सी.ए. अंदानी, सरपंच राम पानमळकर, प्रबोधनकार अ‍ॅड. सुनील तोडकर, कला शिक्षक सचिन गाडे, समृद्धी संस्थेच्या अध्यक्षा स्वाती डोमकावळे, सचिव प्रकाश डोमकावळे आदी उपस्थित होते.


अ‍ॅड. सुनील तोडकर म्हणाले की, कला क्षेत्रात अनेकांचे करिअर घडत आहे. काही मुले अभ्यासामध्ये कमी असले तरी कला क्षेत्रात ते पुढे असतात. त्यांना त्या दिशेने पालकांनी प्रोत्साहन देण्याचे त्यांनी सांगितले. कलाशिक्षक सचिन गाडे यांनी कोणतीही कला अवगत करताना त्यातील बारकावे, शास्त्रोक्त पद्धती जाणून घेण्याची गरज असते. जिद्द, आत्मविश्‍वास व सातत्य ठेवल्यास त्या कलेत पारंगत होता येत असल्याचे त्यांनी सांगितले.


सीए शंकर अंदानी म्हणाले की, मुला-मुलींना मोबाईलच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी उन्हाळी शिबिराला पाठविले पाहिजे. उन्हाळी शिबिरातून मुलांचा सर्वांगीन विकास साधला जातो व त्यांच्या सुप्त कलागुणांना चालना मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरपंच राम पानमळकर यांनी लहान वयातच मुलांच्या भवितव्याचा पाया रचला जातो. त्या दृष्टीने पालकांनी जागरुक राहून त्यांच्या आवडी-निवडी ओळखाव्या आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच कटिबध्द राहण्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता सब्बन यांनी केले. आभार स्वाती डोमकावळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *