छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा उपक्रम
शेटीया बहिण भावाने पटकाविला प्रथम क्रमांक
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त व्यसनमुक्तीवर घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पोस्टर स्पर्धेला उत्सफूर्त प्रतिसाद लाभला. पोस्टर स्पर्धेत युवक-युवतींनी व्यसनाचे दुष्परिणाम दर्शविणारे चित्र रेखाटून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला.

युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असताना छत्रपती संभाजी महाराज यांचे आदर्श व विचार युवकांमध्ये रुजवून त्यांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गुटखा, दारु, धुम्रपान, जुगार याचे दुष्परिणाम दर्शविणारे व व्यसनाने उध्वस्त होणार्या संसाराचे चित्र पोस्टरद्वारे रेखाटून व्यसनमुक्तीवर घोष वाक्य लिहले आहेत. स्पर्धा शालेय विद्यार्थी (इयत्ता 8 वी ते 10 वी) लहान गट तर महाविद्यालयीन वरिष्ठ अशा दोन गटात झाली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, प्रतिभा डोंगरे, ऋषीकेश बोडखे, गौतम फलके, प्रियंका डोंगरे-ठाणगे, सचिन जाधव, छाया वाबळे, दिनकर आंबेकर, मंदा डोंगरे यांनी परिश्रम घेतले.
यामध्ये शालेय विद्यार्थी (इयत्ता 8 वी ते 10 वी) लहान गटात प्रथम क्रमांक उत्कर्ष नितीनकुमार शेटीया (कारमेल कॉन्व्हेंट स्कूल) व महाविद्यालयीन वरिष्ठ गटात प्रथम उन्नती नितीनकुमार शेटीया (अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी) यांनी बक्षिसे पटकाविली. दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्राचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना नेहरु युवा केंद्राच्या वतीने प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार आहे. स्पर्धेसाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात व जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांचे मार्गदर्शन लाभले.