वीस वर्षांच्या निस्वार्थ समाजसेवेची क्रांतीदिनी सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- क्रांती दिनानिमित्त पुणे येथील वानवडी परिसरात आयोजित राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यात अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना यांच्या दीर्घकाळच्या निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल घेत ‘राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. विविध सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणे, पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्यक्ष काम करणे तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.
मातोश्री द्रोपदा बबन पठारे चॅरिटेबल ट्रस्ट, छत्रपती शेतकरी सेना तसेच बहुजन भूमी संघटना संचलित मानव हक्क, माहिती अधिकार, दक्ष पोलिस मित्र सहकार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील महात्मा ज्योतिराव फुले सांस्कृतिक भवन, वानवडी येथे झालेल्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि मुंबईतील प्रसिद्ध कोळी नटसम्राट राजेश खर्डे वेसावकर यांच्या हस्ते विजय भालसिंग यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थापक अध्यक्ष कैलास पठारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष रशीद पठाण, राष्ट्रीय महिला अध्यक्षा रोहिणी भोसले, अल्ताफ शेख, विशाल पवार यांच्यासह सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग हे गेल्या जवळपास दोन दशकांपासून समाजहितासाठी सातत्याने कार्यरत आहेत. एसटी बँकेतील नोकरीची जबाबदारी सांभाळत त्यांनी प्रसिद्धीपेक्षा प्रत्यक्ष समाजसेवेला प्राधान्य दिले असून, अनेक सामाजिक उपक्रम कोणतेही शासकीय अनुदान अथवा वर्गणी न घेता स्वतःच्या खर्चातून राबविले आहेत. ग्रामीण भागातील पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, सार्वजनिक सुविधा, विकासकामे आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी संबंधित शासकीय विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केला. सामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा करणे, ही त्यांच्या कार्याची विशेष ओळख ठरली आहे.
पर्यावरण संवर्धन हे त्यांच्या सामाजिक कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य असून वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरण जनजागृतीसाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्येही पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. दोन दशकांच्या या निस्वार्थ सामाजिक योगदानाची दखल घेऊन त्यांना ‘राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

