वेदांत्मा प्रतिष्ठान, जिल्हा ब्राह्मण सेवा संघाचा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचा उपक्रम
सावरकरांनी अंतिम ध्येय मानवता ठेऊन, वाईट धर्म भावनेवर प्रहार केला -सात्यकी सावरकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंतिम ध्येय मानवता ठेऊन, वाईट धर्म भावनेवर प्रहार केला. हिंदुत्वाची पितृभू व पुण्यभूवर केलेली त्यांची व्याख्या आजही लागू पडते. सावरकरांचे हिंदुत्व बंधुत्वाच्या आधारावर होते. समाजातील पूर्व अस्पृश्यांना जवळ करुन त्यांनी हिंदू समाज जोडण्याचे काम केल्याचे प्रतिपादन सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी केले.

वेदांत्मा प्रतिष्ठान, जिल्हा ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सावेडी, गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या वीर सावरकरांची हिंदुत्वगाथा या विषयावरील व्याख्यानात सात्यकी सावरकर बोलत होते.
यावेळी वेदांत्मा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुमित कुलकर्णी, दिनेश जोशी, किशोर जोशी, इंजि. केतन क्षीरसागर, मंगेश निसळ, प्रदीप पंजाबी, किशोर जोशी, राजाभाऊ पोतदार, योगेश दाणी, साहिल देशपांडे, श्रिया देशमुख आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे सावरकर म्हणाले की, तुरुंगात असताना देखील सावरकरांनी हिंदू समाजाची जागृती केली. हिंदू बंदीवानांना साक्षर केले. समाजातील पूर्व अस्पृश्यांसाठी मंदिर खुले केले. मानवतेच्या दृष्टिकोनाने चळवळ उभारून पूर्व अस्पृश्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. पंगतीने जात बुडते, स्पर्शाने जात बुडते हा भ्रम चुकीचा ठरवून पूर्व अस्पृश्यांना समाजात मान-सन्मान देण्याचे काम केले. हिंदूंना राजकीय दृष्टीने दिशा देण्याचे कार्य सुरु असताना, दुसर्या बाजूने त्यांनी सामाजिक चळवळ चालवली, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेस अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर चित्रफित दाखविण्यात आली. पहिल्यांदाच शहरात आलेल्या सात्यकी सावरकर यांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणारे हेमंत दंडवते, अमित सोनग्रा, श्रीकृष्णा जोशी, जागृती ओबेरॉय, ह.भ.प. प्रभाताई भोंग, अलकाताई मुंदडा, अमित सोनग्रा, राहुल गुंडू, राजकुमार जोशी, श्रिया देशमुख, महेश कुलकर्णी यांना सावरकरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा जोशी यांनी केले. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.