पदग्रहण सोहळ्यात सामाजिक कार्याचा जागर
प्रसाद मांढरे व डॉ. सुदर्शन गोरे यांनी स्विकारली अध्यक्षपदाची सूत्रे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात मागील 30 वर्षापासून सामाजिक योगदान देणारे लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन व 20 वर्षापासून सामाजिक कार्य करणाऱ्या लायन्स मिलेनियमचा संयुक्त पदग्रहण सोहळा लायन्सचे माजी प्रांतपाल रमेश शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मिडटाऊनचे नूतन अध्यक्ष प्रसाद मांढरे व मिलेनियमचे अध्यक्ष डॉ. सुदर्शन गोरे यांना पदाची सूत्रे प्रदान करण्यात आली.
शहरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या संकल्प सेवा कार्याचा या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी विभागीय अध्यक्ष सुधीर डागा, विभाग अध्यक्ष हरिश हरवानी, पदग्रहण संमारंभाचे प्रमुख अनिल कटारिया, महेश पाटील, श्रीकांत मांढरे, संतोष माणकेश्वर, ॲड. रविंद्र शितोळे, संपूर्णा सावंत, माधवी मांढरे, छाया राजपूत, स्वाती जाधव, लतिका पवार, राजश्री शितोळे आदी उपस्थित होते.
दीपप्रज्वलन कार्यक्रमाची सुरुवात झाली. हरीश हरवानी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कल्पना ठुबे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुनंदा तांबे यांनी फ्लॅग होस्टिंग केले. मिडटाऊनचे मावळते अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी मागील वर्षाचा अहवाल सादर करून राबविण्यात आलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. तर लायन्स गार्डनचा प्रकल्प नूतन अध्यक्षांच्या कार्यकाळात मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचा मानस व्यक्त केला. मिलेनियमचे मावळते अध्यक्ष हरीश हरवानी यांनी मागील वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला.

रमेश शहा यांनी नूतन पदाधिकारी यांना कर्तव्याची जाणीव करून देऊन, पदग्रहणाची शपथ दिली. तर त्यांच्या कार्याची जबाबदारी समजावून सांगितली. यावेळी बोलताना शहा म्हणाले की, देण्याच्या संस्काराने लायन्सची समाजसेवा सुरू आहे. जेवढे देतो, त्यापेक्षा अधिक नियतीने पुन्हा मिळत असते. लायन्सने कोट्यावधी रुपये दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी लावले आहेत. अनेक कायमस्वरूपी प्रकल्प वंचितांसाठी उभे केले आहे. या समाजसेवेचा ढोल वाजवला पाहिजे. यामुळे सामाजिक चळवळीत कार्य करण्याची इतरांना प्रेरणा मिळून अधिक व्यापक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. चांगल्या भावनेतून केलेल्या कार्याला समाज देखील बळ देतो. मदत किती मोठी केली? यापेक्षा त्या मागची भावना महत्त्वाची असते. बदलत्या काळात लायन्स मदतीचे स्वरुप देखील बदलत गेला असल्याचे त्यांनी सांगितले.
नूतन अध्यक्ष प्रसाद मांढरे म्हणाले की, सेवेचा संकल्प सिद्धीस घेऊन जाऊन लायन्सच्या माध्यमातून वंचितांना आधार दिला जाणार आहे. पर्यावरण, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन विशेषत: महिला सक्षमीकरण आणि स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी विशेष कार्य करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर मावळत्या अध्यक्षांच्या कार्यकाळात राहिलेला लायन्स गार्डन प्रकल्प उभारणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. सुदर्शन गोरे म्हणाले की, मानव सेवा हीच ईश्वर सेवा, याप्रमाणे क्लबच्या माध्यमातून कार्य करण्यात येत आहे. सेवाभाव हेच उद्दिष्ट समोर ठेवून कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

या पदग्रहण सोहळ्यात मिडटाऊनचे सचिव संदीपसिंग चौहान, खजिनदार संदीप सांगळे व मिलेनियमचे सचिव विजय माळी, खजिनदार हेमंत नरसाळे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पदाची जबाबदारी देण्यात आली. या कार्यक्रमासाठी संजय जैन (पुणे), तुलसीदास खुबानी, राजेंद्र शिरोडे, बाळासाहेब जोरी (कोपरगाव), डॉ. रविंद्र कुटे (श्रीरामपूर) आदी विविध भागातील लायन्सचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय माळी यांनी केले. आभार अनिलकुमार कटारिया यांनी मानले.