तोडीस तोड असलेले बलदंड मल्ल एकमेकांना भिडले
प्रबळ दावेदार मल्लांची आगेकूच
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रीत कुस्ती स्पर्धेच्या दुसर्या दिवशी शनिवारी (दि.22 एप्रिल) मल्लांनी डावचेपांची उधळण करीत उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत तोडीस तोड असलेले बलदंड मल्ल एकमेकांना भिडले.

दोन ठिकाणी मॅटवर व एका लाल मातीच्या आखाड्यात मल्लांनी भारंदाज, एकेरी-दुहेरी पट, मुलतानी, कलाजंग आदी डावपेचांनी प्रतिस्पर्धी मल्लांना आसमान दाखवले. तर काही अटीतटीच्या कुस्त्यात मल्लांनी गुणांनी विजय मिळवला. या स्पर्धेत उतरलेल्या दिग्गज मल्लांनी विजय मिळवून आगेकूच केली. स्पर्धेसाठी प्रबळ दावेदार म्हणून ओळखल्या जाणारे महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व माऊली कोकाटे याने गुणांवर विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. तर सिकंदर शेख याने मनोहर कर्डिलेचा पराभव करुन आगेकूच केली.

यावेळी अनेक प्रेक्षणीय कुस्तीचे सामने कुस्ती प्रेमींना पहावयास मिळाले. अजय अजबे (नगर) विरुध्द केतर घारे (पुणे) यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत झाली. शेवटच्या क्षणा पर्यंत दोन्ही मल्लांनी आक्रमक खेळ केले. अजबे याने 11 गुण मिळवून यादवला 10 गुणांवर रोखून विजय संपादित केला. रात्री उशीरा पर्यंत विविध वजन गटातील उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी कुस्त्या सुरु होत्या.

या स्पर्धेप्रसंगी अर्जुनवीर पुरस्कार प्राप्त काका पवार, संदीप आप्पा भोंडवे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, स्पर्धेचे संयोजक सुवेंद्र गांधी, अनिल शिंदे, जिल्हा तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष पै. वैभव लांडगे, वसंत लोढा, अभय आगरकर, महेंद्र गंधे, दिलीप सातपुते, भानुदास बेरड, सचिन जाधव, सचिन पारखी, सुभाष लोंढे, प्रशांत मुथा, सचिन पारखी, बाबुशेठ टायरवाले, संग्राम शेळके, कुंडलिक चिंधे, प्रताप चिंधे, पै. नाना डोंगरे, नामदेव लंगोटे, मोहन हिरनवाळे, महेश लोंढे, बाळासाहेब भुजबळ, पै. गोरख खंडागळे, पै. श्याम लोंढे, नितीन शेलार, ओंकार सातपुते, पै. अनिल गुंजाळ, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, रेणुका माता पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत भालेराव, पै. संभाजी लोंढे, अजय आजबे, स्वानंद नवसारिकर, आनंदा शेळके, मुन्ना शिंदे आदींसह भाजप, शिवसेना व जिल्हा तालिम संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ व संध्याकाळच्या दोन सत्रात विविध वजन गटातील कुस्त्या पार पडल्या. कुस्त्यांचा थरार पाहण्यासाठी कुस्ती प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व इतर पोलीस अधिकारी यांनी मैदानाची पहाणी करुन विविध सूचना केल्या.
