• Sat. May 10th, 2025

मानवसेवा प्रकल्पातील निराधार मनोरुग्णांना मिठाई व कपड्यांचे वाटप

ByMirror

Dec 22, 2022

अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा उपक्रम

दुखीतांच्या वेदनासाठी मानवसेवा प्रकल्प चंदनाचा लेप -न्यायमुर्ती भाग्यश्री पाटील

अहमदनगर (प्रतिनिधी)- दुखीतांच्या वेदनासाठी मानवसेवा प्रकल्पाचे कार्य चंदनाचा लेप ठरत आहे. कर्मण्येवाधिकरस्ते मा फलेषु कदाचन या गीतेतील तत्वानुसार श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे निस्वार्थीपणे मनुष्यरुपी ईश्‍वरसेवा सुरु असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायमुर्ती भाग्यश्री पाटील यांनी केले.


रस्त्यावरील बेवारस मनोरुग्णांचा सांभाळ करुन त्यांना मानसिक दृष्ट्या बरे करुन त्यांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या अरणगाव येथील श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पास न्यायमुर्ती भाग्यश्री पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक धर्मादाय आयुक्त न्यायमुर्ती उषा पाटील, विधी सेवा प्राधिकरणाचे अ‍ॅड. शर्मिला गायकवाड, अ‍ॅड. भूषण बर्‍हाटे, अ‍ॅड.रावसाहेब बर्डे, कनिष्ठ लिपिक स्वप्नील परदेशी, भारती पाठक, विकास कर्डिले आदी उपस्थित होते.


पुढे न्यायमुर्ती भाग्यश्री पाटील म्हणाल्या की, गतिमंद, बेघर, पिडीत मनोरुग्ण, अंध, अपंग, मरणासन्न अशा समाजातील घटकांना मानवसेवेत माणुसकीचा आधार मिळाला आहे. मानवसेवा प्रकल्पाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने मानवसेवा प्रकल्पातील निराधार पिडीत मनोरुग्ण माता-भगिंनीशी संवाद साधून उपस्थितांनी मिठाई व कपड्यांचे वाटप केले. न्यायमुर्ती भाग्यश्री पाटील यांनी आपणही या समाजाचे देणं लागतो या भावनेने वंचितांसाठी हातभार लावण्याची गरज आहे. सुखी, आनंदी जीवन जगत असताना परमेश्‍वराचे धन्यवाद गरजूंच्या मदतीतून मानले पाहिजे. देण्याच्या भावनेने जी अनुभूती मिळते त्यामधील आनंद समाधान देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.


श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांनी रस्त्यावरील बेवारस मनोरुग्णांना या प्रकल्पात आश्रय देऊन त्यांच्या उपचार व पुनर्वसनासाठी संस्थेच्या माध्यमातून कार्य सुरु आहे. या प्रकल्पातून अनेक मनोरुग्णांना बरे करुन त्यांना त्यांच्या कुटुंबात पुनर्वसन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे अंबादास गुंजाळ, सिराज शेख, सोमनाथ बर्डे, सुरेखा केदार, पुजा मुठे, राहुल साबळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *