शिक्षण संचालक कार्यालया समोर निदर्शने
“मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही” -आप्पासाहेब शिंदे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा राज्यभर सुरू असलेला संप चौथ्या दिवशी अधिक तीव्र झाला असून, पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालय (सेंट्रल बिल्डिंग) येथे आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात अहिल्यानगर येथील माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे आणि हमाल पंचायतचे अध्यक्ष तथा नगरसेवक अविनाश घुले यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
या आंदोलनात हमाल पंचायतचे होळकर, मुख्याध्यापक जाधव सर, पानमंद, संतोष खरमाळे तसेच पुणे जिल्हा शासकीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मारुती शिंदे आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले.
आप्पासाहेब शिंदे म्हणाले की, “राज्यातील कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर वर्ग गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करत आहे. वारंवार निवेदने देऊनही शासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. जुनी पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदे भरणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे या मूलभूत मागण्या आहेत. या मागण्या केवळ कर्मचाऱ्यांच्या नाहीत, तर संपूर्ण प्रशासनाच्या कार्यक्षमतेशी संबंधित आहेत.”
ते पुढे म्हणाले, शासनाने वेळेत निर्णय घेतला नाही, तर हा लढा आणखी तीव्र करण्यात येईल. कर्मचारी वर्ग आता माघार घेणार नाही. हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलो तरी आमचा निर्धार ठाम आहे.”
अविनाश घुले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आज कर्मचारी, शिक्षक आणि श्रमिक वर्ग एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी उभा आहे, ही मोठी ताकद आहे. सरकारने जर अजूनही दुर्लक्ष केले, तर हीच ताकद मोठ्या आंदोलनात परिवर्तित होईल. अन्यायाविरुद्ध लढणे हीच खरी लोकशाही आहे.”
ते पुढे म्हणाले, “सरकारने कर्मचाऱ्यांना रस्त्यावर आणण्याचे काम केले आहे. भर उन्हात आंदोलन करणे ही त्यांची मजबुरी आहे. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे, अन्यथा राज्यभर आंदोलनाची तीव्रता वाढेल. श्रमिक आणि कर्मचारी वर्ग एकदिलाने लढत राहील.”
पुण्यातील सेंट्रल बिल्डिंगसमोर सुरू असलेल्या या आंदोलनात विविध विभागांतील कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणाबाजी, निदर्शने आणि एकजुटीचे प्रदर्शन करत आंदोलनकर्त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.
