• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

महापौरांच्या प्रभागात रिकाम्या खुर्चीला हार घालून रस्ता व पाणी प्रश्‍नावर आंदोलन

ByMirror

Mar 29, 2023

वारुळाचा मारुती मंदिर परिसरातील रस्ता दुरुस्ती व पाणी प्रश्‍न सोडविण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- महापौरांच्या प्रभागातील वारुळाचा मारुती मंदिर परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असताना संतप्त नागरिकांनी खड्डेमय रस्त्यात रिकाम्या खुर्चीला हार घालून लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा निषेध नोंदवला. खड्डेमय रस्ते, धुळीचा फुफाटा व पाणी टंचाईच्या गंभीर प्रश्‍नाकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.


युवा सेनेचे शहर प्रमुख महेश लोंढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सुशील चेन्नुर, ओमकार लेंडकर, हनुमान सब्बन, मधुकर टोने, विजय पठारे, गोरख गोरे, दत्तात्रय सुद्रिक, आप्पा रोहोकले, गोवर्धन लांडे, वैभव बोरुडे, पप्पू घोडके, बबन राजपूरे, अमोल देशमुख, आनंद शिंदे, संदीप दातरंगे, ऋषी सामळ, सुरेश पाटोळे, राधा चेन्नुर, प्रिया चेन्नुर, कीर्ती मदनल, नंदिनी सोळकी आदींसह महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वारुळाचा मारुती मंदिर कमान ते मंदिरा लगत असलेल्या एमएसईबी सबस्टेशन पर्यंत रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, सिना नदीच्या पुलावर तर पावसाळ्यात आलेल्या पूरामुळे अक्षरश: रस्ता वाहून गेला आहे. पूल अत्यंत धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्याने मोठ्या प्रमाणात उडणार्‍या धुळीच्या फुफाट्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मागील दोन वर्षापासून नागरिक या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करत असून, स्थानिक लोकप्रतिनिधी हा रस्ता मंजूर असल्याचे उत्तरे देत आहेत. मात्र अद्यापि या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आलेले नसल्याचे महेश लोंढे यांनी सांगितले.


या भागात पाच घरांसाठी एक नळ कनेक्शन असून, त्याला देखील पाणी येत नसल्याने उन्हाळ्यात पाण्याचा गंभीर प्रश्‍न उभा राहिला आहे. धुळीमुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. नवीन फेज टू नळ योजनेचे फक्त पाईप टाकण्यात आले असून, त्या नळाद्वारे कधी पाणी येणार? असा प्रश्‍न स्थानिक महिलांनी उपस्थित केला. वारुळाचा मारुती मंदिर कमान ते मंदिरा लगत असलेल्या एमएसईबी सबस्टेशन पर्यंत रस्त्याचे काम मार्गी लावावे, धोकादायक पूलाची दुरुस्ती करावी व या भागातील पाण्याचा प्रश्‍न त्वरीत सोडविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *