भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, त्यांच्या सभांवर बंदी आणावी व अटक करण्याची माळी महासंघाची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर माळी महासंघाच्या वतीने बुधवारी (दि.2 ऑगस्ट) महात्मा फुले यांच्यासह इतर महापुरुषांबद्दल वादग्रस्त व चुकीचे वक्तव्य करुन त्यांचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांच्या प्रतिमेस जोडे मारुन काळे फासण्यात आले. तर भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, त्यांच्या सभांवर बंदी आणावी व त्यांना अटक करण्याची मागणी माळी महासंघाने केली.

प्रारंभी महात्मा फुले यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी भिडे यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात माळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष राम पानमळकर, जिल्हाध्यक्ष गणेश बनकर, नितीन डागवाले, नंदकुमार नेमाने, अविनाश शिंदे, ॲड. सुनिल तोडकर, आकाश फुले, तुषार फुलारी, राहुल साबळे, गणेश धाडगे, भुषण भुजबळ, मोहन धाडगे, सावता धाडगे, यश भांबरकर, कैलास दळवी, जालिंदर बोरुडे, बबलू रासकर, सागर बनकर, शेंडीच्या सरपंच प्रयागताई लोंढे, मंगलताई भुजबळ, मनोज फुलसौंदर, ज्ञानेश्वर पांढरे आदी सहभागी झाले होते.
अमरावती येथे एका कार्यक्रमात संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. यापूर्वी देखील त्यांनी देशातील महापुरुष व शिर्डीचे साईबाबा यांच्याबद्दल वादग्रस्त व चुकीचे विधान केले आहे. भिडे यांच्याकडून वारंवार महापुरुषांबद्दल केले जाणारे वक्तव्य हे निंदनीय व निषेधार्ह बाब आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करून देशातील महापुरुषांचा अपमान केला जात आहे. यामुळे देशातील सर्व जनतेच्या भावना दुखावल्या जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
भिडे यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य करुन त्यांना पाठिशी घातले गेल्याने त्यांची महापुरुषांबद्दल अवमानकारक बोलण्याची हिम्मत वाढली आहे. तातडीने भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, त्यांच्या सभांवर बंदी आणावी व त्यांना अटक करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचा विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले.