• Fri. Mar 14th, 2025

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यावरील खूनी हल्ल्याचा निषेध

ByMirror

Jul 1, 2023

आरोपींना फाशी देण्याची मागणी

चर्मकार विकास संघाचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार करुन त्यांच्यावर झालेल्या खूनी भ्याड हल्ल्याचा चर्मकार विकास संघाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. तर या प्रकरणातील आरोपींवर लवकरात लवकर अटक करुन त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करावे, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले. यावेळी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, संतोष कांबळे, दिलीप कांबळे, रुपेश लोंखडे, अशोक बनसोडे, गणेश साळवे, भिकाजी वाघ, महेश काजळकर आदी उपस्थित होते.


उत्तरप्रदेशातील भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार झाला आहे. आझाद हे आंबेडकरी, बहुजन व सामाजिक चळवळीतील नेतृत्व आहे. त्यांच्यावर हल्ला करुन चळवळीला दडपण्याचा प्रकार करण्यात आला आहे. या हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधार शोधण्याची गरज असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार करणार्‍या आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी पोलीस प्रशासनाने 15 दिवसात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे, खटला जलद न्यायालयात चालवून यासाठी नामांकित वकीलाची नेमणुक करावी, जलद न्यायालयात सहा महिन्यात निकाल देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने प्रयत्न करावे, आझाद यांची व त्यांच्या कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी उत्तर प्रदेश सरकारने घेण्याची मागणी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *