डोक्यावर भगवे फेटे व टोप्या परिधान करुन भाविकांचा सहभाग
सकल ब्राह्मण समाज नेहमीच विकासाच्या बाजूने उभा राहिला -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भिंगारमधून पालखीसह उत्साहपूर्ण वातावरणात शोभयात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीत भाविकांसह महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रेतील भाविकांनी भगवान परशुरामचा एकच जय घोष केल्याने संपूर्ण परिसर दुमदुमला.
संत ज्ञानेश्वर मंदिर येथे भिंगार ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉ विलास देशमुख यांच्या हस्ते आरती होवून शोभायात्रेला प्रारंभ झाले. या शोभायात्रेत पालखी खांद्यावर घेऊन आमदार संग्राम जगताप यांनी सहभाग नोंदवला. यावेळी सुमित कुलकर्णी, अभिजीत खोसे, चेतन वसगडेकर, विजय देशपांडे, मकरंद देशमुख, सुनील देशमुख, अॅड. प्रणव धर्माधिकारी, मयूर जोशी, सम्राट धर्माधिकारी, अनिल औटी, किरण मुळे, तेजस देशमुख, आदित्य काळे, अक्षय चौधरी, पंकज धर्माधिकारी आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, सकल ब्राह्मण समाज नेहमीच विकासाच्या बाजूने उभा राहिला आहे. विकास हाच अजेंडा ठेऊन शहरात केलेल्या कार्यामुळे समाजाची चांगली साथ मिळाली. त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही, असे सांगून त्यांनी परशुराम जन्मोत्सवाच्या समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या.
फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये परशुरामांच्या पादुका व मिरवणुकीत भगवान परशुराम यांची प्रतिमा दर्शनास ठेवण्यात आली होती. पालखीसमोर भक्तीगीतांवर भाविकांनी ठेका धरला होता. महिलांनी भजने सादर करुन फुगड्यांच फेर धरला. या शोभायात्रेत महिला व पुरुषांनी डोक्यावर भगवे फेटे व टोप्या परिधान केल्या होत्या. युवकांनी भगवे ध्वज हाती घेऊन जय जय परशुरामचा गजर केला. भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त सकल ब्राह्मण समाजाच्या भिंगारमध्ये विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.