• Sat. Mar 15th, 2025

फ्लाय हायच्या विविध स्पर्धेला मूकबधिर, दिव्यांग, अनाथ व वंचित घटकातील विद्यार्थ्यांचा सहभाग

ByMirror

Jul 3, 2023

गरजू विद्यार्थ्यांना झेप घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ निर्माण करण्याचे फ्लाय हायचे कार्य -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन त्यांना प्रवाहात आणण्याचे कार्य फ्लाय फाय फाऊंडेशन करत आहे. युवकांनी मी व माझे कुटुंबापलीकडे जावून समाज भावनेने योगदान दिल्यास समाजाचा विकास साधला जाणार आहे. तर गरजूंना शिक्षणाची शिदोरी देऊन त्यांना प्रवाहात आणल्यास देश महासत्ता बनेल. मूकबधिर, दिव्यांग, अनाथ व गरजू घटकातील विद्यार्थ्यांना झेप घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ निर्माण करण्याचे कार्य फ्लाय हाय करीत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


फ्लाय हाय फाउंडेशन यांच्या वतीने शिल्पा गार्डन येथे शहरातील मूकबधिर, दिव्यांग, अनाथ व वंचित घटकातील मुलांसाठी नृत्य, निबंध, चित्रकला व फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस मन्सूर शेख, फ्लाय फाउंडेशनच्या संस्थापिका गौरी मुथा, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नितीन बारस्कर, मोहसीन सय्यद, मंजू मुथा, अमित मुथा, निर्मल मुथा, अंचल मुनोत, युगंधरा भालसिंग, सोहम शेटीया, अनुष्का फिरोदिया, अंकुश ठोकळ, सुजल गांधी, आयुष मुथा, युगा मुथा, निधी भंडारी, संचिता कोतकर, साहिल गांधी, आर्यन मुनोत, दिव्यश्री मुनोत, गौरी पटवा, आकांक्षा कटारिया आदी उपस्थित होते.


पुढे आमदार म्हणाले की, कोरोनात गरजूंच्या शिक्षणाच्या जाणीव ठेऊन युवक-युवतींनी स्थापन केलेल्या फ्लाय हायच्या माध्यमातून मागील चार वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्य सुरु आहे. गरजूंसाठी मदत उपलब्ध करुन शैक्षणिक चळवळीत योगदान दिले जात आहे. दुर्बल घटकांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी स्वतःला झोकून सुरु असलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.


नृत्य, निबंध, चित्रकला व फॅन्सी ड्रेस स्पर्धेत शहरातील यतीम खाना, मूकबधिर विद्यालय, बोल फाउंडेशन, जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालय, पंपकिंन हाऊसचे तीनशेपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होवून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. उपस्थितांनी देखील टाळ्यांच्या कडकडाटात या विद्यार्थ्यांना दाद दिली. तर यावेळी विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने मिष्टान्न भोजनाचे वाटपही करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *