‘पर्यावरण संवर्धन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण’चा संदेश देत नव्या जबाबदारीची सुरुवात
पंडित नेहरू हिंदी विद्यालयात शिक्षकांकडून मुख्याध्यापक बाबासाहेब बोडखे यांचा सत्कार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नव्या जबाबदारीची सुरुवात करण्याचा प्रेरणादायी आदर्श माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी घालून दिला. भुईकोट किल्ला परिसरातील पंडित नेहरू हिंदी विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांनी औपचारिक पदभार स्वीकारण्यापूर्वी शाळेच्या परिसरात विद्यार्थी व शिक्षकांसमवेत वृक्षारोपण केले. वृक्षारोपणातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत त्यांनी आपल्या नवीन कार्याची सुरुवात केली.
यावेळी शालेय शिक्षक गोपीचंद परदेशी, कमल भोसले, कविता जोशी, वैभव शिंदे, मोनिका मेहतानी, शिल्पा पाटीळे, परीक्षित सुने, नूतन गाडे, पिंकी वैद्य, मोनिका साळुंके, ठाकूरदास परदेशी, योगेश गायकवाड यांच्यासह शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबासाहेब बोडखे यांनी याच विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सातत्याने उल्लेखनीय काम केले आहे. विशेषतः विविध राज्यांतून आलेल्या हिंदी भाषिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांच्या भाषिक अडचणी दूर व्हाव्यात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून विद्यालयाच्या गुणवत्तेतही वाढ झाली आहे.
शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच खरे शिक्षण या भूमिकेतून त्यांनी सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविले. शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारीही विद्यार्थ्यांमध्ये वाटून दिली. त्यामुळे पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली.
सामाजिक बांधिलकी जपत बोडखे दरवर्षी आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करतात. शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आधार बनण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनात्मक नेतृत्व अशा विविध भूमिका त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या या सर्वांगीण कार्याची दखल घेत त्यांची पंडित नेहरू हिंदी विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी नियुक्ती करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
मुख्याध्यापक बाबासाहेब बोडखे म्हणाले की, वृक्ष म्हणजे जीवन, संस्कार आणि भविष्य. जसे एका रोपट्याचे संगोपन केल्यावर ते मोठे वृक्ष बनते, तसेच विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सकारात्मक विचारांचे सिंचन केले तर ते देशाचे सक्षम नागरिक बनतात. माझे ध्येय केवळ शंभर टक्के निकाल मिळविणे नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याला चांगला माणूस घडविणे हे आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्ता, शिस्त, संस्कार, पर्यावरण संवर्धन, डिजिटल शिक्षण आणि नवोपक्रम यावर विशेष भर दिला जाणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

