राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती दिनी झाला सामाजिक कार्याचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिम पँथर सामाजिक संघटनेच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. राजर्षी शाहू महाराज यांच्या 149 व्या जयंतीनिमित्त श्रीरामपूर येथील माऊली वृध्दाश्रमात झालेल्या कार्यक्रमात डोंगरे यांना पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी शब्दगंध साहित्य परिषदेचे संस्थापक सचिव सुनिल गोसावी, प्रकाश कुलथे, भिम पँथरचे शिवाजी गांगुर्डे, प्रदेश महासचिव कादीर खान, नानासाहेब शिंदे, कवी रज्जाक शेख, आनंदा साळवे, सुभाष वाघुंडे, राजेंद्र देसाई, जयश्री सोनवणे आदी उपस्थित होते.
निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे शाळेत कार्यरत असून, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरु आहे. ग्रामीण भागात वृक्षरोपण, बीजरोपण व वृक्षसंवर्धनासाठी विविध कार्यक्रम घेऊन त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी मोठी जनजागृती केली आहे.
डोंगरे यांनी जिल्हा पातळीवर स्त्री जन्माचे स्वागत, वृक्षरोपण, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जागृती, जलसंधारण जागृती मोहिम व रक्तदान शिबीर व्यापक स्वरुपात राबविले. व्यसनमुक्तीचे उपक्रम राबवून युवकांना दिशा देण्याचे कार्य केले. विविध स्पर्धा, महिला बचत गट मेळावे, काव्य व युवा संमेलन घेऊन समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल डोंगरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.