• Thu. Aug 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

साळवे कुटुंबावरील हल्ला प्रकरणी पोलीस संरक्षण व खोटा गुन्हा ‘ब फायनल’ करण्याची मागणी

ByMirror

Aug 13, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाचे निवेदन

जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाचे निवेदन


गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक करा; टोळीतील गुंडांकडून जीवितास धोका असल्याचा आरोप


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांना अद्यापही टोळीतील आरोपींकडून जीवितास धोका असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच साळवे कुटुंबाविरुद्ध दाखल करण्यात आलेला कथित खोटा गुन्हा ‘ब फायनल’ करून जखमी कुटुंबीय व साक्षीदारांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे आणि गुन्ह्यातील काही फरार आरोपींना तात्कळ अटक करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, शहराध्यक्ष किरण दाभाडे, सतीश मगर, अविनाश भोसले, उत्कर्ष भालेराव, शुभम गायकवाड, राजेंद्र मगर, आदेश साळवे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


निवेदनात करण्यात आलेल्या आरोपानुसार, 24 ऑगस्ट 2025 रोजी रात्री सुमारे 11 वाजता टोळीतील काही व्यक्तींनी सुनिल साळवे यांच्या कुटुंबातील यशदीप संपत साळवे व आदर्श साळवे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, यशदीप साळवे यांचा एक डोळा निकामी झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
जखमींना उपचारासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी गंभीर स्थिती पाहता त्यांना तातडीने अहिल्यानगर येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कुटुंबीय जखमींना अहिल्यानगरला नेण्यासाठी निघाले असताना पुन्हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनानुसार, सुनिल साळवे यांच्या पत्नी रतन, भावजय रेश्‍मा, पुतण्या अभिजीत, भाचा अरविंद, त्यांची पत्नी सोनाली आणि लहान पुतण्या कोहिनूर हे रात्री सुमारे 12 वाजता नानज येथून जामखेडकडे येत असताना 15 ते 17 जणांच्या टोळीने तलवारी, कोयते व लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात अभिजीतवर 17 ते 18 वार करण्यात आल्याचा आरोप असून, त्याच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे. पत्नी रतन यांच्या एका हाताला गंभीर इजा झाली असून, भावजय रेश्‍मा यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


या घटनेनंतर साळवे कुटुंब दहशतीच्या वातावरणात असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, साळवे कुटुंबीयांवर गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपी व त्यांच्या नातेवाईकांकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. गुन्हा मागे न घेतल्यास खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार यापूर्वीच पोलिसांकडे करण्यात आल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. यानंतर साळवे कुटुंबातील चार व्यक्तींविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा कथित खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करुन न्याय देण्याचे आश्‍वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले होते.


या पार्श्‍वभूमीवर साळवे कुटुंबावर दाखल करण्यात आलेल्या कथित खोट्या गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करून तो ‘ब फायनल’ करण्यात यावा, हल्ल्यातील जखमी व साक्षीदारांना तातडीने पोलीस संरक्षण द्यावे, तसेच साळवे कुटुंबाच्या जीवितास असलेला धोका लक्षात घेऊन आवश्‍यक ती सुरक्षा व्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *