25 गावातील सरपंच, अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा सहभाग
बालविवाह व बालमजुरीचे वाढते प्रमाण अनपेक्षित व वेदनादायी -रफिक सय्यद
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात एक वर्ग मोठ्या प्रमाणात सुशिक्षित होत असताना, दुसरीकडे बालविवाह व बालमजुरीचे वाढते प्रमाण अनपेक्षित व वेदनादायी आहे. अजूनही या समस्या वाढत असून, याचे मूळ कारण शोधून त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने कार्य सुरू करण्यात आले असून, हे प्रश्न सोडविण्यासाठी लोकसहभाग देखील महत्त्वाचे ठरणार आहे. स्थलांतरित होणार्या समाजात प्रामुख्याने बालविवाहाचे प्रश्न दिसून येत असल्याचे प्रतिपादन नगर तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी रफिक सय्यद यांनी केले.
नवीन टिळक रोड येथील श्रमिक कार्यालयात वंचित विकास संस्था (खंडाळा), क्राय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गाव बाल संरक्षण समितीचे अधिकार, कर्तव्य, जबाबदारी या विषयावर कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सय्यद बोलत होते. याप्रसंगी बाल न्याय मंडळाच्या बेबीताई बोर्डे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, माध्यमिक तालुका विस्तार अधिकारी प्रकाश शिंदे, विस्तार अधिकारी राजेंद्र थोरात, क्राय संस्थेचे सचिव राजेंद्र काळे, प्रकाश कदम, नंदा साळवे, कोमल भापकर, मंदा कांबळे, आरती भोसले, कोमल शिंगाडे, स्वाती उदांडे, हसीना पठाण, सुवर्णा धावडे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात राजेंद्र काळे म्हणाले की, शाळाबाह्य मुले, बालविवाह, बाल कामगार हे प्रश्न सोडविण्यासाठी गाव बाल संरक्षण समितीचे कार्य महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या समित्या अधिक सक्षम करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शासनाने देखील या समित्यांकडे लक्ष देऊन त्या अधिक प्रभावी करण्यासाठी योगदान देण्याचे स्पष्ट केले.
बाल न्याय मंडळाच्या बेबीताई बोर्डे म्हणाल्या की, मुलांचा गुन्हेगारी वाढता सहभागाबद्दल शोध घेऊन व वर्गवारी करून प्रश्न सोडविण्यात येत आहे. निर्भया प्रकरणानंतर राज्याची परिस्थिती पाहून, अहवाल मागवून कायदा करण्यात आला. गुन्ह्यात मुलांचा सहभाग आहे की, त्यांचा वापर करून घेतला जात आहे. हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरत आहे. जन्मतः कोणी गुन्हेगार नसतो, त्याचे एखाद्या गुन्ह्यात नाव आले तर त्याला गुन्हेगारी वृत्तीने पाहणे हा समाजाचा दृष्टीकोन चुकीचा आहे. गुन्हा घडलेल्या बालकांना गुन्हेगारी प्रमाणे वागणूक न देता, अशा मुलांचे पुनर्वसन होण्यासाठी त्यांचे समुपदेशन करून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य केले जात आहे. या सामाजिक प्रश्नांवर तळागाळा पर्यंत काम करताना स्वयंसेवी संस्थांची भूमिका व कार्य महत्त्वाचे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेसाठी 25 गावातील सरपंच, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी सहभागी झाले होते. गाव पातळीवर 18 वर्षाच्या आतील मुलांना संरक्षित वातावरण निर्माण करणे, त्यांचे न्याय, हक्क व अधिकार जोपासण्यासाठी गाव बाल संरक्षण समितीचे कार्य, समितीची स्थापना, जबाबदारी व भूमिकेबद्दल माहिती देण्यात आली.