• Sat. Sep 20th, 2025

केडगाव देवी येथे रेणुका माता अखंड हरिनाम सप्ताहाचे प्रारंभ

ByMirror

Feb 26, 2023

जगदंबा तरुण मंडळ, जगदंबा ग्रुप व शिवमुद्रा ग्रुपचा उपक्रम

धर्म, अध्यात्म्याचा आधार भावी पिढीच्या संस्कारासाठी उपयुक्त -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- धर्म, अध्यात्म्याचा आधार भावी पिढीच्या संस्कारासाठी उपयुक्त ठरत आहे. सप्ताहाच्या माध्यमातून समाजात प्रबोधन करुन दिशा देण्याचे कार्य सुरु आहे. रेणुका माता देवस्थान येथे सातत्याने सुरु असलेले धार्मिक व सामाजिक कार्य दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


केडगाव (देवी) रेणुका माता मंदिर समोर जगदंबा तरुण मंडळ, जगदंबा ग्रुप व शिवमुद्रा ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रेणुका माता अखंड हरिनाम सप्ताहाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर व माजी महापौर संदीप कोतकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या सप्ताहाप्रसंगी नगरसेवक अविनाश घुले, मनोज कोतकर, राहुल कांबळे, नगरसेविका गौरीताई ननावरे, लताताई शेळके, इंजि. प्रसाद आंधळे, उद्योजक जालिंदर कोतकर, उद्योजक राजेंद्र घुले, सचिन कुलथे, एकनाथ कोतकर, कोंडीराम वीरकर, दिगंबर सुंबे, मोहन औटी, तुकाराम कोतकर, बाबासाहेब वायकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


पुढे आमदार जगताप म्हणाले की, देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. या भावनेने देवी रोडच्या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले. पूर्वी या परिसराची अत्यंत दयनीय अवस्था होती. काही राजकारणी नवरात्रीमध्ये फक्त राजकारणापुरते यायचे. मात्र स्थानिक युवकांनी केलेल्या पाठपुराव्याने रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अविनाश घुले म्हणाले की, धार्मिक सप्ताहाच्या माध्यमातून युवकांना दिशा मिळत आहे. तर समाजाची वास्तव दशा देखील कळत आहे. समाजप्रबोधनातून जीवनाचा खरा आनंद व उद्देशाची जाणीव होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बहिरु कोतकर यांनी केले. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब (बच्चन) कोतकर यांनी या धार्मिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.


या सप्ताहाचे हे 19 वे वर्ष आहे. प्रारंभी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते टाळ, मृदुंग, विणा, ध्वज यांची विधीवत पूजा करण्यात आली. सकाळी 8 ते 10 या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकारांचे कीर्तन होणार असून, 3 मार्च रोजी भव्य दिंडी प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. तसेच 4 मार्च रोजी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत काल्याचे किर्तन होणार आहे. तसेच या सप्ताहात पहाटे काकडा आरती, सकाळी ग्रंथराज तुकाराम गाथा पारायण व देवी भागवत कथा, संध्याकाळी हरिपाठ व रात्री हरिकीर्तन नंतर जागरचे धार्मिक कार्यक्रम पार पडत आहे.


या सप्ताहाप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब (बच्चन) कोतकर, भागिनाथ कोतकर, राघू ठुबे, बहिरू कोतकर, रुपेश गायकवाड, नवनाथ कोतकर, अजित कोतकर, अण्णा शिंदे, अनिकेत कोतकर, संजय तरटे, राहुल कोतकर, अमोल कोतकर, नवनाथ मिसाळ, शैलेश सुंबे, सोनू घेंबूड, सचिन सरोदे, महेश सरोदे, शिरसागर महाराज, शिर्के महाराज, पाटसकर महाराज आदींसह जगदंबा तरुण मंडळ, शिवमुद्रा ग्रुपचे युवक आणि केडगाव भजनी मंडळ तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *