सामाजिक कार्याचा गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या ज्योतीताई उनवणे यांना सामाजिक कार्याबद्दल शहरात जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने व वाडा तालुक्यात (जि. पालघर) येथील आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
नुकताच हा पुरस्कार वितरण सोहळा नगर शहर व वाडा तालुक्यात पार पडला. शहरात प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर तर वाडा तालुक्यात पंचायत समितीचे सभापती अस्मिताताई लहांगे व नगराध्यक्ष गीतांजलीताई कोलेकर यांच्या हस्ते उनवणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ज्योतीताई उनवणे या अनेक वर्षापासून महिलांचे संघटन करुन सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत. मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी त्यांनी कराटेचे प्रशिक्षण दिले. गरजू व निराधार बालकांच्या शिक्षणासाठी त्या सातत्याने मदत करत आहे. तर महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी देखील त्यांचा पुढाकार असतो. शिवरायांचे गड, किल्ले मोहिमेत त्या सहभागी होऊन, किल्ले संवर्धनाचे कार्य करत आहेत. सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातूनही समाज जागृतीचे त्यांचे कार्य सुरु आहे.
त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सामाजिक कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असून, नेपाळमध्ये देखील पुरस्काराने त्यांच्या कार्याचा गौरव झाला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल जाडकर, आस्था संस्थेचे अध्यक्ष डॉ. वीरेंद्र भोईर यांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हे पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.