यात्रा उत्सवातील कुस्ती हंगामा व मैदानामुळे कुस्ती मल्लांना आधार -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- काळकुप (ता. पारनेर) गावातील पीर बाबा व बिरोबा यात्रेनिमित्त जिल्ह्यातील पैलवानांच्या कुस्त्यांचे मैदान रंगले होते. कुस्ती मैदानात डाव-प्रतिडावाने कुस्तीचे रंगतदार सामने रंगले होते. लाल मातीच्या आखाड्यात रंगलेल्या चितपट कुस्त्यांच्या थराराने ग्रामस्थांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
जिल्हा तालिम संघाचे खजिनदार पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते मुलांच्या कुस्ती लावून कुस्ती मैदानाला प्रारंभ करण्यात आले. यावेळी सरपंच भागाजी कदम, चेअरमन शिवाजी खरमाळे, पांडुरंग साळके, ज्ञानदेव खरमाळे, बाळासाहेब कदम, विनायक साळके, भाऊसाहेब अडसुळ, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कदम, तंटामुक्तीचे अध्यक्ष भाऊसाहेब खरमाळे, गंगाराम खरमाळे, गुरुकुल कुस्ती संकुलचे अध्यक्ष पै. गणेश जाधव, प्रमोद गोडसे, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश रोहोकले, रमेश रोहोकले, कुस्ती निवेदक अक्षय मुळुक, अनिल शिंदे आदींसह ग्रामस्थ व मल्ल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पै. नाना डोंगरे यांनी गावातील यात्रा उत्सवात भरविण्यात येणारा कुस्ती हंगामा व मैदानामुळे कुस्ती मल्लांना मोठा आधार मिळाला आहे. दोन वर्ष कोरोनामुळे कुस्ती मल्लांवर उपासमारीची वेळ आली होती. गावातील कुस्त्यांमुळे नवीन मल्लांना चालना मिळत असून, अनेक नवीन पैलवान पुढे येत आहे. तर मोठा इतिहास असलेल्या पारंपारिक कुस्ती खेळाला चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
या जंगी मैदानात 21 ते 51 हजार रुपयाचे बक्षीस असलेल्या जिल्ह्यातील नामवंत मल्लांच्या कुस्त्या लावण्यात आल्या. अनेक रंगतदार कुस्त्या चितपट झाल्या तर काही बरोबरीत सोडविण्यात आले. चितपट कुस्ती करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात विजयी मल्लास दाद देऊन रोख बक्षीसही दिले. कुस्ती पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.