स्वत:चे अजेंडे पक्षाचे दाखवून, निष्ठावान कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप
त्या पदाधिकारीकडून महापालिका निवडणुकीत पक्षाची उमेदवारी देण्याच्या भूल थापा – मोसिम शेख (युवक शहर जिल्हाध्यक्ष )
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात युवक काँग्रेसच्या बैठकीवरुन झालेला वादंग पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चांगलाच जिव्हारी लागला असून, निष्ठावान कार्यकर्ते व युवकच्या पदाधिकार्यांनी एकत्र येऊन रविवारी (दि.12 मार्च) रात्री बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याविरोधात बंड पुकारला आहे. स्वत:चे अजेंडे पक्षाचे दाखवून कार्यकर्त्यांची दिशाभूल, निष्ठावान कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता केली जाणारी मनमानी, मनपा निवडणुकीत पक्षाचे तिकीट देण्याचे दिली जाणारे खोटी आश्वासने, मी म्हणजेच काँग्रेस! असे विविध आरोप करुन कार्यकर्त्यांनी किरण काळे यांच्या वैयक्तिक कार्यक्रमात सहभागी न होता, पक्षाच्या ध्येय-धोरण व पक्ष श्रेष्ठीनूसार काम करणार असल्याचे बैठकीत जाहीर केले. तर किरण काळे हटाव… काँग्रेस बचाव! चा नारा यावेळी देण्यात आला.
या बैठकीसाठी युवक शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव योगेश काळे, युवकचे माजी शहर जिल्हाध्यक्ष मयुर पाटोळे, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अज्जू शेख, नगरसेवक आसिफ सुलतान, डॉ. रिजवान सय्यद, शहर उपाध्यक्ष विशाल कळमकर, बाळासाहेब भंडारी, ब्लॉक अध्यक्ष श्यामराव वाघस्कर, शहर सरचिटणीस जुबेर शेख, नलिनी गायकवाड, सुनीता बागडे, सागर इरमल, नईम सरदार, देवेंद्र कडू, वाहीद शेख, गणेश भोसले आदी उपस्थित होते.
शहर युवक काँग्रेस व युवक काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकार्यांची बैठक शनिवारी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीचे आमंत्रण नसताना शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी बैठकीत सहभागी होऊन केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहे. त्यावेळी देखील पदाधिकार्यांनी किरण काळे चले जाव! च्या घोषणा दिल्या होत्या. तर आता निष्ठावान कार्यकर्त्यांनी थेट बैठक घेऊन त्यांच्या विरुध्द बंड पुकारला आहे.
रविवारी झालेल्या बैठकीत युवक शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख म्हणाले की, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पक्षाच्या नावाखाली स्वत:चे अजेंडे राबवित आहे. मी म्हणजे काँग्रेस असा त्यांचा गैरसमज झाला आहे. इतर पक्षातून आलेला हा पदाधिकारी निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून मनमानी कारभार करत आहे. त्यांनी शहरातील कोणत्याही प्रभागात अजून पक्षाची शाखा उघडली नाही. फक्त कुरघोड्याच्या राजकारणात ते मग्न असल्याने शहरातील काँग्रेस नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर महापालिका निवडणुकीत पक्षाची उमेदवारी देण्याच्या भूल थापा ते कार्यकर्त्यांना देत आहे. काँग्रेसचा उमेदवार निवडण्याचा स्थानिक पदाधिकार्यांना अधिकार नसून, या भूल थापांना बळी न पडण्याचे त्यांनी आवाहन केले.
श्यामराव वाघस्कर म्हणाले की, शहर जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली दर महिन्याला कार्येकर्ते बदलत असून, निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. वरिष्ठ नेत्यांना अंधारात ठेऊन त्यांचा हुकुमशाही पध्दतीने कारभार सुरु आहे. युवक काँग्रेसच्या बैठकीत आमंत्रण नसताना त्यांनी येऊन बैठकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष काळे पक्षात आल्यापासून गटातटाचे राजकारण वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. नलिनी गायकवाड यांनी शहर काँग्रेसच्या कार्यक्रमात महिलांना देखील डावलले जात असून, अस्तित्वात असलेली महिला कार्यकारणी देखील अनाधिकृत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मयुर पाटोळे म्हणाले की, वैयक्तिक अजेंडे निष्ठावान कार्यकर्त्यांना मान्य नाही. तो पदाधिकारी शहरात स्वतःच्या फायद्यासाठी व वैयक्तिक भांडणासाठी पक्षाचा वापर करत आहे. इतर पक्षातून आलेला तो पदाधिकारी काँग्रेसचा प्रोटोकॉल पाळत नाही. त्याने पक्षात हुकूमशाही निर्माण केली आहे. स्टंट करुन शहरात त्यांनी बिचकुले पॅटर्न राबविला असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक आसिफ सुलतान यांनी काँग्रेसच्या नेत्यांना भेटण्यासाठी अगोदर शहर जिल्हाध्यक्षाची परवानगी घ्यावी लागते. नेत्यांकडे जावू दिले जात नाही. मोठ्या आशेने पक्षात आलो, मात्र या पदाधिकार्यामुळे भ्रमनिरास झाला. प्रभागात निधीची अपेक्षा होती. मात्र जिंदाबाद-मुर्दाबादसाठीच कार्यकर्त्यांचा उपयोग करुन घेण्यात आल्याची त्यांनी खंत व्यक्त केली. तर त्या पदाधिकार्याला विधानसभेत स्वत:चे अस्तित्व समजले असले, तरी त्यांनी मनपाची निवडणुक लढवून आपली लायकी सिध्द करण्याचे त्यांनी आवाहन केले.