स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून पाहिले काम
कराटे खेळ हा महिला व युवतींसाठी स्वसंरक्षणासाठी सर्वोत्तम -गौस शेख
अहमदनगर (प्रतिनिधी)- इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप अबुधाबी (दुबई) येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगरचे वरिष्ठ कराटे प्रशिक्षक गौस अमीर शेख उपस्थित होते. तर शेख यांनी या स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून देखील काम पाहिले.
दुबईचे कराटे प्रशिक्षक मोहम्मद अब्दुल हकीम यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सात देशाच्या एक हजार पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला. प्रशिक्षक गौस शेख यांच्याबरोबर पुणे येथील उद्योजक अहमद यार चौधरी व दुंबई मध्ये कराटेचे प्रशिक्षण देणारी नेहा गौस शेख यांच्यासह दुबईतील क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आयोजकांच्या वतीने गौस शेख यांचा सत्कार करण्यात आला.
गौस शेख म्हणाले की, कराटे खेळ हा महिला व युवतींसाठी स्वसंरक्षणासाठी सर्वोत्तम आहे. भारतासह परदेशात देखील कराटे खेळाला खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कराटे खेळातून शारीरिक व्यायाम होऊन निरोगी आरोग्य राहण्यास मदत होते. या खेळाला ऑलिम्पिकची देखील मान्यता असून, या खेळात अनेक खेळाडू गुणवत्ता सिध्द करत असल्याचे त्यांनी सांगितले. तर या खेळाच्या प्रचार-प्रसारासाठी अहमदनगर व दुबई मध्ये प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून कार्य सुरु असल्याचे त्यांनी माहिती दिली.