आमदार जगतापांच्या हस्ते 20 वृक्षांचे रोपण; हरदिन मॉर्निंग ग्रुपचा स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश
जॉगिंग पार्कच्या विकासासाठी निधी देणार -आ. संग्राम जगताप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमधील योग भवन येथे हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते योग भवनच्या प्रांगणात 20 विविध झाडांचे रोपण करण्यात आले. त्याचबरोबर जॉगिंग पार्क परिसरात स्वच्छता अभियान राबवून सार्वजनिक स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष संगोपनाचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमातून केवळ जयंती साजरी न करता सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी केला. नियमित व्यायाम, योग, स्वच्छता आणि वृक्षसंवर्धनाच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य व पर्यावरण या दोन्हींचे रक्षण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. या कार्यक्रमात हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य संजय भिंगारदिवे यांच्या सेवापूर्तीनिमित्त, रमेश वराडे यांची स्वामी विवेकानंद प्रबोधिनी ट्रस्टच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच जॉगिंग पार्कमधील वृक्षसंवर्धनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल ताराचंद ठोकळ व अशोकराव पराते यांचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान, भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी मिळावा, यासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना निवेदन देण्यात आले. जॉगिंग पार्कच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन आमदार जगताप यांनी यावेळी दिले. यावेळी सचिन चोपडा, जहीर सय्यद, सर्वेश सपकाळ, दिलीप गुगळे, सुभाष पेंढुरकर, योगेश चौधरी, इवान सपकाळ, दिलीप ठोकळ, अभिजीत सपकाळ, दीपक मेहतानी, सुंदरराव पाटील, सखाराम अळकुटे, विलास आहेर, अशोक लोंढे, सरदारसिंग परदेशी, विकास भिंगारदिवे, रतनशेठ मेहेत्रे, रामनाथ गर्जे, जोगिंदरसिंग, उमाशंकरसिंग पंडित, अविनाश पोतदार, प्रकाश देवळालीकर, राजीव कांबळे, इंजि. अनिलराव सोळसे, दशरथ मुंडे, दीपक घोडके, अविनाश जाधव, सुधीर कपाळे, नवनाथ वेताळ, कुमार धतुरे, सूर्यकांत कटोरे, सचिन कस्तुरे, देविदास गंडाळ, जालिंदर अळकुटे, संतोष लुनिया, विशाल भामरे, दीपक अमृत, नाना दळवी आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कचा परिसर हिरवाईने आणि निसर्गसौंदर्याने फुलविण्यामध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपचे मोठे योगदान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रुपचे सदस्य नियमितपणे या परिसराची स्वच्छता, वृक्षसंवर्धन आणि देखभाल करण्याचे काम करत आहेत. त्यांच्या या सामाजिक योगदानामुळे जॉगिंग पार्कचा परिसर नागरिकांसाठी अधिक प्रसन्न आणि आरोग्यदायी झाला आहे. भिंगार परिसरातील नागरिकांसह शहरातील अनेक नागरिक व्यायाम, योग व मॉर्निंग वॉकसाठी या निसर्गरम्य परिसरात येतात. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जॉगिंग पार्कच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
महात्मा गांधी यांनी स्वच्छतेला जीवनातील महत्त्वाचा भाग मानले होते, तर लालबहादूर शास्त्री यांनी साधेपणा, शिस्त आणि राष्ट्रसेवेचा आदर्श देशासमोर ठेवला. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन नागरिकांनी आपल्या परिसराची स्वच्छता राखण्यासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून मागील 25 वर्षांपासून आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत. केवळ वृक्षारोपण करून थांबण्याऐवजी लावलेल्या झाडांची नियमित निगा राखणे आणि त्यांचे संगोपन करणे हीच खरी पर्यावरणसेवा आहे. त्यामुळे जॉगिंग पार्कमधील वृक्षांची देखभाल करण्याची जबाबदारी ग्रुपच्या सदस्यांनी सातत्याने पार पाडली आहे. गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून नागरिकांमध्ये सार्वजनिक स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जॉगिंग पार्कमध्ये येणाऱ्या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी नेहमीच आमदार संग्राम जगताप यांचे सहकार्य मिळत असून, त्यांच्या माध्यमातून योग भवन उभे राहिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

