डोंगरे संस्था, नवनाथ युवा मंडळ, ग्रामीण विकास सेवा मंडळ व धर्मवीर वाचनालयाने केला सन्मान
दिवा पेटविण्यासाठी दिवा लावला पाहिजे.., झोपलेल्या गावासाठी मला जागले पाहिजे… काव्याला प्रेक्षकांची दाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, ग्रामीण विकास सेवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आदर्श शिक्षकांसह सामाजिक क्षेत्रात योगदान देणार्यांना विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांना जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
निमगाव वाघा (ता. नगर) येथील मिलन मंगल कार्यालयात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी नगर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन साहेबराव बोडखे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, प्राचार्या तथा कवियत्री गुंफा कोकाटे, प्रा.डॉ. शैलेंद्र भणगे, उद्योजक दिलावर शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रास्ताविकात पै. नाना डोंगरे म्हणाले की, कोरोना काळातही शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांनी योगदान दिल्याने विद्यार्थी व सर्वसामान्य घटकांना आधार मिळाला. त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान व्हावा, या उद्देशाने संस्थेच्या वतीने पुरस्कार देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाहुण्यांचे स्वागत प्रतिभा डोंगरे यांनी केले.
माधवराव लामखडे म्हणाले की, शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांमुळे समाज सावरला असून, कोरोना काळात समाजाची अत्यंत बिकट अवस्था झाली होती. मयत झालेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी देखील कोणी पुढे येण्यास तयार नव्हते. या परिस्थितीमध्ये शिक्षकांनी विद्यादानाचे पवित्र कार्य केले. तर सामाजिक कार्यकर्त्यांनी गरजूंना विविध प्रकारे मदत देऊन आधार दिला. त्यांच्या कार्याचा सन्मान होण्यासाठी संस्थेने घेतलेला पुढाकार प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. कवियत्री गुंफा कोकाटे यांनी दिवा पेटविण्यासाठी दिवा लावला पाहिजे.., झोपलेल्या गावासाठी मला जागले पाहिजे!… या काव्याला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. तर सावित्रीबाई फुले व महात्मा फुलेंचा वारसा शिक्षक समर्थपणे पुढे घेऊन जात आहे. शिक्षण क्षेत्रात कार्य करताना समाजभान ठेऊन योगदान दिल्यास भावी सक्षम पिढी निर्माण होणार असल्याचे, त्या म्हणाल्या. तसेच शिक्षण व सामाजिक कार्यावर त्यांनी कविता सादर केल्या.

प्रा.डॉ. शैलेंद्र भणगे यांनी संस्थेच्या माध्यमातून नेहमीच शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्काररुपी मिळणारे पाठबळ प्रेरणादायी असल्याचे सांगितले. यावेळी भरत बोडखे, प्रा. रंगनाथ सुंबे, बाबासाहेब महापुरे, प्रशांत जाधव, भाऊसाहेब डोंगरे, राजू हारदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय साबळे यांनी केले. आभार युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे यांनी मानले.
यांना मिळाले पुरस्कार:-
या पुरस्कार वितरण सोहळ्यात आदर्श शिक्षक पुरस्कार- क्रीडा शिक्षक लॉरेन्स अँथनी बलराज (ता. श्रीरामपूर), माधुरी मगर-काकडे (पुणे), प्रवीण शरद बोर्डे (पुणे), सुधीर भगवान डेंगळे (दौंड, जि. पुणे), प्रतिभा सुधीर डेंगळे (दौंड, जि. पुणे), मीनाक्षी कैलास कर्डिले (नगर), सहदेव मधुकर कर्पे (नगर), गणेश भरत वालझाडे (नगर), सचिन रामदास गवांदे (ता. अकोले), भाऊसाहेब सुखदेव थोरात (नगर), आनंदा खंडू झरेकर (ता. पारनेर), उमादेवी सतीश राऊत (नगर), शेख मीराबक्ष खुदाबक्ष बागवान (ता. श्रीरामपूर), आदर्श मुख्याध्यापक व प्राचार्य पुरस्कार- गुंफा कोकाटे (श्रीरामपूर), डॉ. शैलेंद्र भणगे ( औरंगाबाद), शेख अब्दुल कादिर (नगर), अर्जुन सदाशिव भांगे (केडगाव).
आदर्श पर्यावरण मित्र पुरस्कार- सुरेश खामकर, आदर्श परिचारिका गौरव पुरस्कार- सविता मारुती ठोकळ (टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर), ज्योती विठ्ठल बेलोटे (वडझिरे, ता. पारनेर), समाज भूषण पुरस्कार- दिनकर जगन्नाथ सदाफळ (ता. श्रीरामपूर), विद्या अरुण क्षीरसागर (श्रीरामपूर), इरफान जहागीरदार (नगर), कला भूषण पुरस्कार- दौलत पोपट पवार (राहुरी), अजय प्रकाश घोंगरे (श्रीरामपूर), बाबासाहेब शामराव जगताप (नगर), समाज रत्न पुरस्कार- विकास नारायण जगधने (नगर), योगेश पोपट पिंपळे (नगर), सदाशिव सुखदेव थोरात (श्रीरामपूर), सोनल गणेश तरटे (नगर), सोमनाथ मन्मत जंगम (केडगाव, नगर) यांना स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा जयंती तसेच छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेचे बक्षिस वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
