स्वराज्य व स्वातंत्र्याच्या लढा विद्यार्थ्यांनी रंगमंचावर केला जिवंत
यशस्वी होण्यासाठी उत्तम विद्यार्थी व उत्तम माणूस व्हावे -डॉ.एस.एस. दीपक
अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो.च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडियम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
अठरापगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करुन छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य…, पारतंत्र्यात ब्रिटिशांविरोधात सन 1857 पासूनचा पहिला लढा ते स्वातंत्र्याच्या सुवर्ण पहाट उगविताना स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले बलिदान तर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना भारतीय संस्कृतीचे दर्शन रंगमंचावर घडविण्यात आले.

स्नेहसंमेलनाचा हा दिमाखदार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.एस.एस. दीपक व ज्योती दीपक यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, सहप्रमुख कार्यवाह गौरव फिरोदिया, विश्वस्त अॅड. गौरव मिरीकर, सुनंदा भालेराव, सल्लागार समिती सदस्या आशाताई फिरोदिया, पुष्पाताई फिरोदिया, मंगला कुलकर्णी, प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्या कविता सुरतवाला आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात छायाताई फिरोदिया म्हणाल्या की, स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील सोनेरी क्षण असतात. यामध्ये कला-गुणांचा विकास साधला जातो. शाळेने विद्यार्थ्यांना दिलेली संस्कार, शिक्षणाची शिदोरी आयुष्यभर उपयोगी येत असल्याचे त्यांनी सांगून, आई-वडिलांचा आदर-सन्मान करण्याचे आवाहन केले.


कार्यक्रमाची सुरुवात जिम्नॅस्टिक व रोप मल्लखांबच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी झाली. मुलींनी जिम्नॅस्टिकद्वारे शारीरिक लवचिकतेचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर केले. तर रोप मल्लखांबावर 10 ते 15 फुट उंचीवर विद्यार्थ्यांनी विविध कवायती व धाडसी प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.

सिध्दी मते, आदिती कचरे या विद्यार्थ्यांनी डॉ.एस.एस. दीपक व ज्योती दीपक यांची मुलाखतीद्वारे त्यांचा जीवनपट उलगडला. शालेय जीवन, वैद्यकीय क्षेत्रातील प्रवास, कोरोना काळातील सेवा याबद्दल विविध प्रश्नांद्वारे त्यांच्या जीवनातील माहिती जाणून घेतली.
डॉ. एस.एस. दीपक म्हणाले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी उत्तम विद्यार्थी व उत्तम माणूस होण्याची गरज आहे. जीवनात चांगली माणुसकी हा सर्वोत्तम गुण आहे. तो विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. कामाप्रती प्रामाणिकपणा ठेऊन समाजाला देणे लागते या भावनेने माणुसकी रुजली गेली पाहिजे. विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय निश्चित करुन मोठी स्वप्ने पहावी व ती साकार करण्यासाठी जिद्द, कष्ट व आत्मविश्वासाने पूर्ण करण्यासाठी सर्वस्वीपणाला लावण्याचे त्यांनी सांगितले.


शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा जन्म…, हातात तलवारी घेऊन चिमुकल्या मावळ्यांचे नृत्य…, अश्वावरुन थेट रंगमंचावर अवतरलेले शिवाजी महाराज तर अभूतपूर्व शिवराज्याभिषेक सोहळा या कार्यक्रमातून जिवंत करण्यात आला. 1857 मध्ये मंगल पांडे यांनी दिलेला लढा, जालियनवाला बाग हत्याकांड, झाशीची राणीचा ब्रिटिशांविरोधात लढा आदी विविध स्वातंत्र्यपूर्व काळातील अंगावर शहारे आणणारे घटना विद्यार्थ्यांनी आपल्या बहारदार सांस्कृतीक कार्यक्रमातून सादर केल्या. उपस्थित पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.


उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक वर्षात शैक्षणिक, कला, क्रीडा, विज्ञान व सांस्कृतिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. आभार विद्यार्थी प्रतिनिधी ईशांत बल्लाळ व मुग्धा कुलकर्णी यांनी मानले. या भव्य-दिव्य सोहळ्याचे शिस्तबध्द व उत्तमरित्या नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
