• Fri. Sep 19th, 2025

अन्याय विरोधात युद्ध, हे धर्माचे रक्षण -ह.भ.प. प्रभाताई भोंग

ByMirror

Jun 6, 2023

धर्म आणि कर्तव्य या विषयावर महिलांना मार्गदर्शन

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वांची भक्ती एकाच भगवंता पर्यंत पोहचत असते, कोणाचीही भक्ती व देव लहान अथवा मोठा नसतो. अन्याय सहन न करता, त्याचा बिमोड करा, हीच धर्माची शिकवण आहे. भगवान श्रीकृष्णाने देखील कौरवांच्या अन्याया विरोधात अर्जुनाच्या माध्यमातून युद्ध घडवून आणले. अन्याय विरोधात युद्ध हे धर्माचे रक्षण असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. प्रभाताई भोंग यांनी केले.


प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात धर्म आणि कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन करताना ह.भ.प. भोंग बोलत होत्या. यावेळी ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, कु. श्रृती आंधळे, अ‍ॅड. निलिमा औटी, उषा गुगळे, मेघना मुनोत, उज्वला बोगावत, जयश्री पुरोहित, सुजाता पूजारी, हिरा शहापूरे आदींसह ग्रुपच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


पुढे ह.भ.प. भोंग म्हणाल्या की, संघे शक्ती कलियुगे! याप्रमाणे महिलांनी देखील सामाजिक कार्यासाठी एकत्र पुढे आले पाहिजे. महिलांनी चुल व मूल पुरते मर्यादित न राहता समाजाला दिशा द्यावी व भावी पिढीवर संस्कार रुजवावे. अन्याय होत असल्यास धावून जावे. धर्माचे रक्षण करताना इतर धर्मावर अन्याय होणार नाही, याची देखील दक्षता घेण्याचे आपला धर्म शिकवत असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकात उषा गुगळे यांनी महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. ज्योती बोरा यांनी आई-वडिलांची महती सांगून त्यांची सेवा करुन साक्षात देवाची उपासना होत असल्याचे स्पष्ट केले. संगिता गांधी यांनी गीत सादर केले. कु. श्रुती हिने वारकरी संप्रदायातील संत परंपरेवर अभंग सांगून, त्याचा अर्थ विशद केला.


मेघना मुनोत यांनी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये वैशाली आपटे, सोनल लखारा, मिनाक्षी कुलकर्णी, अरुणा गांधी, शारदा नहार, अलका कांबळे विजेत्या ठरल्या. विजेत्या महिलांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. आभार हिरा शहापूरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *