• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

हरदिन मॉर्निंग ग्रुपची स्नेहालयातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची मदत

ByMirror

Jul 4, 2022

शैक्षणिक मदतीने ज्योती परदेशी यांच्या सेवापुर्तीचा आगळा-वेगळा सन्मान

शैक्षणिक साहित्याची मदत करुन, गुरुचा झालेला सन्मान आदर्शवत -डॉ. सुधीर तांबे

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुर्गम व दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना घडविणार्‍या शिक्षिका ज्योती सिताराम परदेशी यांच्या सेवापुर्ती कार्यक्रमात त्यांच्या सन्मानार्थ हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने स्नेहालयातील गरजू घटकातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची मदत देण्यात आली.


ग्रुपच्या सदस्या असलेल्या ज्योती परदेशी यांचा आगळा-वेगळा सन्मान सामाजिक उपक्रमाने करण्यात आला. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, कॅन्टोमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, स्नेहालयाचे प्रा. डॉ. गिरीश कुलकर्णी, राजीव गुजर, ज्योती परदेशी, शरद झोडगे, पोपट नगरे, रमेश त्रिमुखे, सचिन चोपडा, किशोर भिंगारकर, रमेश वराडे, दिपक बडदे, सर्वेश सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, दिलीप गुगळे, तुषार धाडगे, सुभाष गोंधळे, अभिजीत सपकाळ आदींसह ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करुन, गुरुचा झालेला सन्मान आदर्शवत आहे. गरजूंच्या शिक्षणासाठी आपले नेहमीच सहकार्य राहणार आहे. शैक्षणिक चळवळीत पुर्णपणे सहकार्य देऊन काही कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.


प्रा. डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी हर दिन मॉर्निंगग्रुपचे सामाजिक कार्यात असलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. त्यांनी गरजूंच्या शिक्षणासाठी चालवलेली चळवळ निश्‍चितच सर्वसामान्यांना आधार ठरणार असल्याचे स्पष्ट केले. राजीव गुजर यांनी स्नेहालयातील मुलांना देण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचा चांगल्या पध्दतीने उपयोग होणार आहे. गरजूंच्या शिक्षणासाठी केलेली मदत भविष्यात बदल घडविणारी असणार असल्याचे त्यांनी सांगितले.


संजय सपकाळ म्हणाले की, आरोग्य चळवळीसह पर्यावरण संवर्धनासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुप कार्य करत आहे. ग्रुपच्या वतीने एक पाऊल पुढे टाकून, शहरातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत केली जाणार आहे. हे कार्य निरंतर सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्योती परदेशी यांनी जिल्हा परिषद शाळेत 38 वर्षे अध्यापनाचे कार्य केले. त्यांनी अकोले तालुक्यातील दुर्गम भागात व दुष्काळी पाथर्डी तालुक्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाने घडविले. त्या भिंगार येथे 40 वर्षापासून वास्तव्यास असून, गरजूंसाठी शैक्षणिक चळवळ चालविण्याचा त्यांचा मानस आहे. हरदिनच्या या आगळ्या-वेगळ्या सन्मानाने भारावल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *