आयुक्तांचे हॉकर्सना बैठकीत आश्वासन
अहमदनगर (प्रतिनिधी)- कापड बाजार, मोची गल्ली व घास गल्ली परिसरातील हॉकर्सच्या पदाधिकार्यांसह महापालिकेत आयुक्त शंकर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी उपायुक्त यशवंत डांगे, अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे, रिजवान शेख, हॉकर्स युनिटी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष साहेबान जहागीरदार, राजू खाडे, रमेश ठाकूर, नंदकुमार रासने, नवेद शेख, अनिल ढेरेकर, संतोष रासने, फिरोज पठाण, नितीन नाळके, कल्पना शिंदे, गफ्फार शेख, दत्ता शिंदे, मिनाक्षी शिंगी, कमलेश जव्हेरी आदी हॉकर्स प्रतिनिधी उपस्थित होते.
साहेबान जहागीरदार यांनी अतिक्रमणाच्या नावाखाली, पथविक्रेत्यांचा रोजगार हिरावून न घेता, पथ विक्रेता अधिनियमाची अंमलबजावणी करावी, कापड बाजार, मोची गल्ली व घास गल्ली परिसरातील हॉकर्सना वार्यावर न सोडता त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी बैठकित केली. यावर आयुक्त गोरे यांनी कापड बाजारातील हॉकर्ससाठी सोमवार (दि.4 एप्रिल) पर्यंत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. व्यापार्यांचा विरोध नसेल, अशा पध्दतीने तोडगा काढण्यात येणार आहे. हॉकर्सना महापालिका वार्यावर सोडणार नसून, पथ विक्रेता अधिनियमाची अंमलबजावणी करुन त्यांच्यासाठी बाजारपेठ लगतच जागा निश्चित करण्याची हालचाल सुरु असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. महापालिकेकडून हॉकर्ससाठी पुन्हा शरण मार्केट व बेग पटांगणामध्ये पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. याला सर्व हॉकर्सनी विरोध दर्शवून बाजारपेठच्या ठिकाणी व्यवस्था करुन देण्याची विनंती केली.