• Wed. Mar 26th, 2025

सहा वर्षापासून वंचित असलेल्या महापालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळावा

ByMirror

Jun 10, 2022

अहमदनगर महापालिका कर्मचारी कृती समितीचे आयुक्तांना निवेदन

ऑगस्ट पर्यंत कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू होणार असल्याचे आयुक्तांचे आश्‍वासन

अहमदनगर (प्रतिनिधी)- सहा वर्षापूर्वी लागू करण्यात आलेला सातवा वेतन आयोगापासून महापालिकेचे कर्मचारी अद्यापि वंचित असून, महापालिकेच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर महापालिका कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळाने आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी माजी नगरसेवक अनिल शेकटकर, राजू पठारे, संतोष नवसुपे, भगवान जगताप, संतोष जाधव, समितीचे अध्यक्ष बाळासाहेब उमाप, उपाध्यक्ष लखन गाडे, सचिव संजय साठे, संदीप पठारे आदी उपस्थित होते.


आयुक्त गोरे यांनी महापालिकेच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्यात आलेला असून, ऑगस्ट पर्यंत कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याचे शिष्टमंडळास आश्‍वासन दिले.


सातवा वेतन आयोग केंद्र सरकार व राज्य सरकार यांना 2016 यावर्षी लागू होऊन जवळपास सहा वर्षे झाली आहेत. परंतु अहमदनगर महानगरपालिकेतील कर्मचार्‍यांना त्याचा लाभ अद्याप पर्यंत लागू झालेल्या नाही. वास्तविक पाहता महाराष्ट्रातील बहुतांशी नगरपालिका व महानगरपालिका यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे. कोरोना महामारीमध्ये सर्व कर्मचारींनी आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांची सेवा केली. त्या कामात काही कर्मचारी यांना आपला जीव गमवावा लागला आहे. बरेचसे कर्मचारी कोरोनाने बाधित झाल्यावर उपचाराकरिता नातेवाईकांकडून उसनवारी तर सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन कर्जबाजारी झालेले आहेत. काही जण आपल्या घरातील कमावत्या व्यक्तींना गमावून आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. सध्याची आकाशाला भिडलेली महागाई पाहता कर्मचार्‍यांना जीवन जगणे अवघड बनले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. कर्मचार्‍यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेऊन महापालिकेच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करण्याच्या मागणी महापालिका कर्मचारी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *