आजार मुळापासून कायमचे नष्ट होण्यासाठी होमिओपॅथी शास्त्राकडे वळण्याची गरज -पद्मश्री पोपट पवार
ग्रीस येथील इंटरनॅशनल अॅकडमी ऑफ क्लासिकल होमिओपॅथी स्कूल संलग्न ई लर्निंग डिप्लोमाचा समावेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- तणावपूर्ण जीवन व चुकीच्या आहार पध्दतीमुळे भविष्यात मानसिक व शारीरिक आजार ही प्रमुख समस्या राहणार आहे. सध्या भारतात अनेक आजार व व्याधी वाढत असून, हे आजार मुळापासून कायमचे नष्ट होण्यासाठी होमिओपॅथी शास्त्राकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनात अनेक रुग्ण अॅलोपॅथीचे उपचार घेऊन बरे झाले. मात्र शरीरावर झालेल्या उपचाराचे हळूहळू दुष्परिणाम दिसू लागले असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपट पवार यांनी केले.
शहरातील जुनी वसंत टॉकीज येथे सुरु करण्यात आलेल्या होलिस्टिक क्लासिकल होमिओपॅथी क्लिनिक अॅण्ड रिसर्च सेंटरच्या शुभारंभप्रसंगी पद्मश्री पवार बोलत होते. यावेळी आमदार निलेश लंके, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, माजी नगरसेवक ज्ञानदेव पांडुळे, नगरसेवक मनोज कोतकर, दत्ता कावरे, दिलीप सातपुते, संभाजी पवार, रयतचे उत्तर विभाग निरीक्षक टी.पी. कन्हेरकर, उद्योजक विपुल डोंगरे, विशाल गुंड, अमोल शेवाळे, किसन सातपुते, वडगाव गुप्ताचे सरपंच विजय शेवाळे, व्याख्याते गणेश शिंदे, डॉ. चंद्रकांत कोरडे, पी.बी. कर्डिले, डॉ. हेमंत देशपांडे, राजेंद्र शेवाळे, रावसाहेब सातपुते, यशोदाबाई लंके, मुख्याध्यापक शिवाजी लंके, होमिओपॅथी तज्ञ डॉ. प्रमोद लंके, रोहिणी लंके, रक्षा लंके आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढे बोलताना पद्मश्री पवार म्हणाले की, झटपटचा जमाना असल्याने होमिओपॅथी व आयुर्वेद शास्त्राला वेळ लागत असल्याने ही उपचार पध्दतीचा सहसा अवलंब केला जात नाही. पूर्वीचे नाडी परीक्षण संपले असून, सध्या विविध चाचण्या व त्यानूसार औषधे नाहीतर शस्त्रक्रिया करुन रुग्णांना लवकर बरे केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर मोठ्या प्रमाणात खतांचा वापर केल्याने देशातील माती दूषित होऊन जमीनीचे आरोग्य बिघडले आहे. यामुळे अन्नामधून देखील आजारांचे प्रमाण वाढण्याच्या समस्या निर्माण झाले असून, आहार, पाणी, माती या नैसर्गिक घटकाच्या माध्यमातून भविष्यातील संकटे ओळखण्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी या होमिओपॅथी क्लिनिक अॅण्ड रिसर्च सेंटरचा शुभारंभ फीत कापून व होमिओपॅथीचे संशोधक तथा संस्थापक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या पुतळ्याचे अनावरण करुन करण्यात आले. अकॅडमीचे उद्घाटन डॉ. अतुल जग्गी व डॉ. लतिका जग्गी यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी भेट देऊन अकॅडमीला शुभेच्छा दिल्या.
डॉ. प्रमोद लंके यांनी प्रास्ताविकात मागील 22 वर्षापासून शहरात व केडगाव मध्ये होमिओपॅथीच्या माध्यमातून प्रॅक्टिस सुरू आहे. आजारांना कायमचे मुळापासून नष्ट करण्यासाठी या प्रभावी शास्त्राचा उपयोग लोककल्याणासाठी व्हावा. याच्या प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने रिसर्च सेंटर व अकॅडमी सुरु करण्यात आली आहे. ही अकॅडमी ग्रीस येथील इंटरनॅशनल अॅकडमी ऑफ क्लासिकल होमिओपॅथी स्कूलशी संलग्न असून, जगभरातील अनेक दिग्गज डॉक्टर ऑनलाईन प्रशिक्षणाद्वारे शहरातील भावी डॉक्टरांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आमदार निलेश लंके म्हणाले की, आरोग्यासाठी कोणताही दुष्परिणाम नसलेले होमिओपॅथीशास्त्र आरोग्याच्या दृष्टीने एक चांगला पर्याय म्हणून पुढे आले आहे. आरोग्य जपण्यासाठी याकडे नागरिकांनी येण्याची गरज असून, कोरोना काळात देखील होमिओपॅथीच्या माध्यमातून अनेक रुग्णांना उपचार दिल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञानदेव पांडुळे यांनी फॅमिली डॉक्टर ते सध्याचा स्पेशल डॉक्टरांचा काळ यांचा आढावा घेतला.
दादाभाऊ कळमकर म्हणाले की, होमिओपॅथी शास्त्रात फसवणूक नाही. हे शास्त्र रुग्णाला पूर्णतः मुळासकट बरे करतो. यामध्ये कालावधी जास्त लागत असला, तरी शंभर टक्के फरक पडतो. होमिओपॅथीचे रिसर्च सेंटर जिल्ह्यात पहिल्यांदाच निर्माण झाले असून, याचा फायदा भविष्यात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इमरान तांबोली यांनी केले. आभार शिवाजी लंके यांनी मानले.