• Sun. Jan 26th, 2025

शहरातील चितळे रोडचा श्‍वास मोकळा होण्यासाठी

ByMirror

Feb 21, 2022

रस्त्यावर बसणार्‍या भाजी-फळ विक्रेत्यांना नेहरु मार्केटच्या मोकळ्या जागेत स्थलांतरित करावे

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील चितळे रोड येथे रस्त्यावर बसणारे भाजी-फळ विक्रेत्यांना नेहरु मार्केटच्या मोकळ्या जागेत स्थलांतरित करून नागरिकांना रस्ता वाहतुकीस मोकळा करुन देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश गुंडला यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील महापालिकेच्या मालकिची चितळे रोड येथील भाजी मार्केटची मोठी इमारत सुमारे दहा ते बारा वर्षांपूर्वी पाडण्यात आलेली आहे. सदर ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जागा विनावापर पडून आहे. जागेच्या मूल्यांकनप्रमाणे निविदा प्रक्रिया होत नसल्यामुळे सदर जागा विनाकारण मोकळी पडून आहे. मनपाला या जागेतून प्राप्त होऊ शकणारे प्रास्तावित उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे विनाकारण महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. नेहरु मार्केट पाडल्यामुळे त्या ठिकाणचे भाजी-फळ विक्रेते रस्त्यावर आले आहे. यामुळे या भागात दररोज वाहतुक कोंडी होत असून, नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
सदर ठिकाणी रस्त्यावर उभे राहणार्‍या फेरीवाले, भाजी व फळ विक्रेत्यांच्या गाड्या नेहरु मार्केटच्या मोकळ्या जागेत लावण्याची व्यवस्था करुन दिल्यास वाहतुक कोंडीचा प्रश्‍न सुटून, रस्ता मोकळा होणार आहे. या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स अथवा प्रास्तावित बांधकाम होईपर्यंत हातगाडीवाले, भाजी-फळ विक्रेत्यांना आतमध्ये बसण्याची सक्ती केल्यास मनपाला देखील उत्पन्न मिळणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
नेहरु मार्केटच्या मोकळ्या जागेत महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करुन, या ठिकाणी हातगाडीवाले, भाजी-फळ विक्रेत्यांना व्यवसाय करण्याची सक्ती करावी, रस्त्यावर बसणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी गुंडला यांनी केली आहे. तर यामुळे रस्त्यावर बसणार्‍या फळ-भाजी विक्रेत्यांचे देखील पुनर्वसन होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *