वाकडी येथे राजाभाऊ कापसे यांच्या कुटुंबीयांचे करणार सांत्वन; शिर्डीत पत्रकार परिषदेसह शोकसभेला राहणार उपस्थित
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते ना. रामदास आठवले सोमवार, दि. 24 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव लोकनेते राजाभाऊ कापसे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ना. आठवले वाकडी (ता. राहाता) येथे भेट देणार आहेत. या दौऱ्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी दिली.
ना. रामदास आठवले हे दिल्लीहून विमानाने छत्रपती संभाजीनगर विमानतळावर सकाळी 11 वाजता दाखल होणार आहेत. त्यानंतर श्रीरामपूरमार्गे वाकडी येथे ते दुपारी सुमारे 12 वाजता पोहोचणार आहेत. येथे लोकनेते राजाभाऊ कापसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन ते सांत्वन करणार आहेत. यानंतर वाकडी येथे सर्वपक्षीयांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेला ना. रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने लोकनेते राजाभाऊ कापसे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. कापसे यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दुपारी 3 वाजता ना. रामदास आठवले हे शिर्डी येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषदेनंतर भोजन करून ते चारचाकी वाहनाने मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या जिल्हा दौऱ्याला रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ना. आठवले यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाच्या आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध आघाड्यांचे पदाधिकारी तसेच समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजय वाघचौरे, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, संजय डोळसे तसेच विभागीय अध्यक्ष भीमा बागुल यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या दौऱ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. राजाभाऊ कापसे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आणि शोकसभेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने वाकडी येथे उपस्थित राहणार आहेत.
–—
दौऱ्याचा नियोजित कार्यक्रम
- सकाळी 11 वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन
- दुपारी 12 वा. वाकडी, ता. राहाता येथे आगमन व कापसे कुटुंबीयांचे सांत्वन
- त्यानंतर सर्वपक्षीय शोकसभेला उपस्थिती व श्रद्धांजली
- दुपारी 3 वा. शिर्डी येथे पत्रकार परिषद
- पत्रकार परिषदेनंतर भोजन व चारचाकी वाहनाने मुंबईकडे प्रस्थान

