राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे आयुक्तांना निवेदन

अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरातील नगर-औरंगाबाद महामार्ग कोठला येथील ईदगाह मैदानची रमजान ईद नमाज पठणच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता करुन सुविधा पुरविण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी महापालिका आयुक्तांना दिले. यावेळी नगरसेवक समद खान, अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष वसिम शेख आदी उपस्थित होते.
सध्या मुस्लिम धर्मियांचा रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. चंद्रदर्शन झाल्यानंतर मंगळवार दि.3 मे रोजी ईद होण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या निर्बंधामुळे रमजान ईदची नमाज ईदगाह मैदान येथे सामुदायिक पध्दतीने होऊ शकलेली नाही. यावर्षी राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथील केले असून, यावर्षी ईदची नमाज ईदगाह मैदान येथे होणार आहे. मात्र ईदगाह मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता व दुर्गंधी पसरलेली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सदर भागातील काही दुकानदार व नागरिक टाकाऊ कचरा ईदगाह मैदानच्या पलीकडील रस्त्याच्या कडेला आणून टाकत आहे. तसेच या भागात असलेल्या लाईटच्या डिपीच्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर या परिसराची स्वच्छता करणे आवश्यक असून, तातडीने या परिसराची स्वच्छता करण्याचे आदेश द्यावे. तसेच ईदच्या दिवशी नमाजसाठी येणार्या भाविकांसाठी हात-पाय धुण्यासाठी (वजू) पाण्याची व्यवस्था तर फिरते शौचालयाची व्यवस्था करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे.

सध्या शहरात भारनियमन सुरु आहे. तातडीच्या भारनियमनाखाली अवेळी विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. ईदच्या नमाजवेळी वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची देखील दक्षता घेण्याचे सांगण्यात आले आहे. तर या भागातील अस्वच्छतेचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसवून कचरा टाकणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.