• Sun. May 18th, 2025

मुंगसे बाप लेकावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

ByMirror

Feb 22, 2022

बांधकाम ठेकेदाराने पैसे मागितल्याचा राग येऊन केली होती जातीवाचक शिवीगाळ व मारहाण

आरपीआय महिला आघाडीच्या पाठपुराव्याला अखेर यश

अहमदनगर (प्रतिनिधी)- बांधकामाचे पैसे मागितल्याचा राग येऊन जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी अशोक मुंगसे व त्यांचे दोन मुले तुषार व विकास मुंगसे यांच्यावर लक्ष्मी शाहूराव आरोळे यांच्या फिर्यादीवरुन सोमवारी (दि.21 फ्रेबुवारी) तोफखाना पोलीस स्टेशनला अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी पोलीस स्टेशनला 16 फेब्रुवारीला अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. आरपीआय (गवई) महिला आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या प्रकरणात आरोपींवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. आरपीआय महिला आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश येऊन आरोपींवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी लक्ष्मी शाहूराव आरोळे (रा. गांधीनगर बोल्हेगाव) या विधवा असून, त्यांचा मुलगा सचिन आरोळे हा बांधकाम व्यावसायिक आहे. तो बांधकामाचा ठेका घेऊन काम करत असतो. त्याने गांधीनगर, बोल्हेगाव परिसरात घरा जवळील अशोक मुंगसे यांच्या घराचे बांधकाम करण्याचे काम एक घेतले होते. सदर बांधकाम पूर्ण होण्याच्या स्थितीमध्ये आहे. बांधकामाची काही रक्कम बाकी असल्याने, आरोळे याने अशोक मुंगसे यांच्याकडे पैश्यासाठी तगादा लावला होता. परंतु पैसे देण्यास ते टाळाटाळ करीत होते. 16 फेब्रुवारी रोजी आरोळे याने अशोक मुंगसे यांना पुन्हा पैसे मागितले. याचा राग येऊन त्या दिवशी दुपारी चार वाजेच्या दरम्यान अशोक मुंगसे यांचे दोन्ही मुले तुषार व विकास हे आमच्या घरी आले. तेव्हा तुषार व अशोक मुंगसे याने जातीवाचक शिवीगाळ वक्तव्य करून अपमानित केले. जवळील लाकडी दांडक्याने डाव्या पायाच्या मांडीला मारले, तर पाठीमध्ये लाथा मारून शिवीगाळ केली. तसेच मुलगा सचिन यास तोंडावर चापट मारुन शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत लक्ष्मी आरोळे यांनी म्हंटले आहे. सदर प्रकरणी अशोक मुंगसे व त्यांचे दोन्ही मुले तुषार व विकास मुंगसे यांच्यावर भा.द.वि. कलम 324, 323, 504, 506, 34 तसेच अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा दाखल करुन घेण्यासाठी महिला आघाडीच्या ज्योती पवार, अलका बोर्डे, आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, ओबीसी आघाडीचे विजय शिरसाठ, सुयोग बनसोडे, राहुल गायकवाड, संदीप वाघचौरे, सतीश पुंड आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची समक्ष भेट घेऊन झालेला प्रकार सांगितला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *