• Sat. Feb 8th, 2025

माजी विद्यार्थ्यांची स्नेह मेळाव्यातून सामाजिक बांधिलकी

ByMirror

May 22, 2022

वंचित विद्यार्थ्यांसाठी खेळाचे साहित्य भेट

अहमदनगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील विद्या मंदिर प्रशाळेच्या 2002 साली बारावीला असणार्‍या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शहरात नुकताच रंगला. तब्बल 20 वर्षानंतर आणि कोविड सारख्या मोठ्या आपत्तीनंतर प्रथमच मोठ्या संख्येने शालेय मित्र-मैत्रिणी जमले होते. कोविड आणि मधल्या काळखंडात त्यांनी आपल्या अनेक मित्र आणि गुरुवर्यांना गमावले. त्यांच्या स्मरणार्थ नगरच्या युवान संस्थेमार्फत 100 वंचित विद्यार्थ्यांसाठी सारेगमपफेम अंजली गायकवाड हिच्या हस्ते खेळाचे साहित्य भेट देण्यात आले. तसेच युवानच्या सामाजिक कार्यासाठीही आर्थिक सहयोग युवानचे प्रमुख संदीप कुसळकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. मैत्रीला 20 वर्ष पूर्ण झाल्यानिम्मित वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून अनोख्या पद्धतीने आनंद साजरा करण्यात आला.


या कार्यक्रमात गायिका अंजली गायकवाड आणि वंचित बालकांनी उत्स्फूर्त आवडीची गाणी गाऊन मैत्रीची मैफिल सजविली. यावेळी मनोगतात अंजलीने शाळा हेच भावी जीवन घडविण्याचे सर्वात मोठे माध्यम असल्याचे नमूद केले. सुरवातीस सर्व मित्र-मैत्रिणींनी आपली ओळख करूनदेत मनोगते व्यक्त केली. काही शिक्षकांचे संदेशही कार्यक्रमात वाचून दाखविण्यातआले. सामाजिक, व्यावसायिक, नोकरी आणि कुटूंब सांभाळतांना शाळेचे संस्कारच कामी आल्याचे सर्वांनी आवर्जून सांगितले.

पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिकसह विविध जिल्ह्यातून हे 50वर्गमित्र, मैत्रिणी गेट टू गेदरसाठी एकत्र आले होते. गेट टू गेदर आयोजनाकामीस्वाती दराडे,मोनाली चोरडीया, प्रीती सावज, संदिप कुसळकर, तुषार काळे, सचिन रोकडे, रुपिंदरसिंग कथुरिया, रुपेश झंवर, संतोष आळंदे, योगेश कटारे, जयंत जाधव, सल्लाउद्दीन शेख आदींनी पुढाकार घेतला.


पस्तिशी ओलांडल्यामुळे सर्व मित्रमैत्रिणी काका-काकू झाल्याने अनेकांना शरीरयष्टीपाहून हसूआवरत नसल्याचे चित्र दिसले.शिक्षकांचामार, बालपणीच्या गमती जमती आणि सध्याची सुख-दुःखे जुन्या मित्र-मैत्रिणींनी एकमेकांशी बोलले. संध्याकाळ झाली तरी जुन्या मित्रांना सोडून परतीच्या प्रवासासाठी पाय माघारी फिरत नव्हते. जातांना एक सुंदर आणि आशयसंपन्न स्नेहमेळावा पार पडल्याचे समाधान सर्वांच्याच चेहर्‍यावर झळकत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *