• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

बाजारपेठेतील व्यापारी व हॉकर्सचे मोहरमनिमित्त एकाच व्यासपिठावरुन सरबतचे वाटप

ByMirror

Aug 7, 2022

व्यापारी व हॉकर्सच्या वादावर अखेर पडदा

पूर्वीसारखे सर्व धार्मिक उत्सव व राष्ट्रीय सण व्यापारी व हॉकर्स एकत्रपणे साजरे करणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- मोहरमनिमित्त कापड बाजार व घास गल्ली येथील व्यापारी व हॉकर्सनी एकाच व्यासपिठावर येऊन सरबतचे वाटप केले. काही महिन्यांपूर्वी शहराच्या बाजारपेठेतील व्यापारी व हॉकर्सचा वाद विकोपाला गेला असताना, दोन्ही एकत्र आल्याचा सुखद धक्का नगरकरांना बसला. व्यापारी व हॉकर्सचे वादावर अखेर पडदा पडल्याचे अधोरेखित झाले.


हॉकर्स युनिटी असोसिएशनच्या वतीने मोहरमनिमित्त शरबत वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमस्थळी तिरंगे झेंडे लाऊन सामाजिक एकतेचे दर्शन सर्व धर्मिय व्यापारी व हॉकर्सनी घडविले.

सरबत वाटप उपक्रमाची सुरुवात कोतवाली पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक संजय झिंजे, व्यपारी असोसिएशनचे अध्यक्ष ईश्‍वर बोरा, प्रदीप रासने, महावीर कांकरिया, प्रतीक बोगावत, हॉकर्स संघटचे अध्यक्ष साहेबान जहागीरदार, मुजाहिद (भा) कुरेशी, खालिद शेख, मोहसीन शेख, गफ्फार शेख, नदीम शेख, अशरफ शेख, राजू खाडे, नवेद शेख, अज्जू शेख, सरफराज कुरेशी आदींसह हॉकर्स व व्यापारी बांधव उपस्थित होते.


ईश्‍वर बोरा म्हणाले की, हॉकर्स व व्यापारी बाजारपेठेतील एक घटक असून, दोघांमध्ये एकोपा राहिल्यास बाजारपेठेचा विकास होणार आहे. ग्राहकांना चांगल्या प्रकारच्या सेवा देता येतील. मागील संघर्ष हा तात्पुरता होता. तो मिटला असून, व्यापारी व हॉकर्समध्ये मतभेद होते मात्र मनभेद नव्हते, असे त्यांनी सांगितले. तर व्यापारी व हॉकर्सनी यापुर्वी देखील अनेक उपक्रम संयुक्तरित्या राबविले असल्याचे त्यांनी स्पष्ट करुन या उपक्रमाचे कौतुक केले.


साहेबान जहागीरदार यांनी बाजारपेठेत सर्व धर्मिय व्यापारी व हॉकर्स गुण्यागोविंदाने आपले व्यवसाय करीत आहे. काही प्रमाणात वाद विकोपाला गेले होते, मात्र एकमेकांबद्दलची नाराजी दूर झाली आहे. पूर्वीसारखे सर्व धार्मिक उत्सव व राष्ट्रीय सण व्यापारी व हॉकर्स एकत्रपणे साजरे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *