महिलांनी स्वत:च्या उत्पादनांचे ब्रॅण्डिंग करुन बाजारपेठ काबिज करावी -आ. निलेश लंके
अहमदनगर (प्रतिनिधी)- बचत गटातील महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चैतन्य संस्था प्रेरित स्त्री शक्ती ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ (सुपा) व राजमाता जिजाऊ संघ (पारनेर) यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटातील महिलांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व मेळावा उत्साहात पार पडला. या प्रदर्शनाचे व कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार निलेश लंके व चैतन्य संस्थेच्या संस्थापिका सुरेखाताई श्रोत्रीय यांच्या हस्ते झाले.
जन शिक्षण संस्थेच्या कार्यक्रम सल्लगार कमलताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष विजय औटी, जन शिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, कौशल्याताई थिगळे, प्रजाताई पाईकराव, आनंता मसकरे, ज्योती पवार, उज्वला मंदिलकर, अश्विनी रावजे, सुनीता पाडळे, वैजयंता हरेल, अलका कदम, शैला भांबरे, शोभा ढुस आदींसह महिला बचत गटाच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आमदार निलेश लंके यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा विकास साधला जात असून, सर्वसामान्य कुटुंबातील महिला आर्थिक संपन्न होत आहे. महिला पायावर उभी राहिल्यास कुटुंबाला मोठा आधार होत असतो. कोरोना काळात सर्वकाही बंद असताना बचत गटातील महिलांचे काम मात्र सुरु होते. महिलांनी स्वत:च्या उत्पादनांचे ब्रॅण्डिंग करुन बाजारपेठ काबिज करण्याचे त्यांनी आवाहन केले. तर प्रदर्शनाची पहाणी करताना आमदार लंके यांनी मसाला डोसा व इटलीचा आस्वाद घेतला.
या महिला बचत गटाच्या प्रदर्शनात लहान मुलांसह महिलांचे कपडे, विविध खाद्य पदार्थ, स्वच्छतेचे साहित्य, कॉस्मेटिक्स, आयुर्वेदिक औषधे, पापड, हस्तकलेचे साहित्य आदी विविध वस्तूंचे सत्तर स्टॉल लावण्यात आले होते. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या लाभार्थी यांना आमदार निलेश लंके यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
सुरेखाताई श्रोत्रीय यांनी चैतन्य संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना पायावर उभे करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे. महिलांना शिवणकाम, ब्युटी पार्लर, शेळी पालन, मसाले बनविणे, नऊवारी साडी, फिनेल बनविणे अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सन 1988 साली संस्थेच्या कार्याला प्रारंभ होऊन 1993 साली संस्थेची नोंदणी झाली. या संस्थेशी संलग्न बचत गटातील महिलांचे कार्य महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड येथे सुरू आहे. महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या सहकार्याने संस्थेच्या वतीने 20 हजार महिलांना औद्योगिक व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.महिला मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रतिभा, अनामिका, जयश्री, साधना, प्रिया, प्रियंका, पूजा, सारिका, छाया आदी महिलांनी परिश्रम घेतले.