• Wed. Mar 26th, 2025

निमगाव वाघा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

ByMirror

Jun 22, 2022

नेहरु युवा केंद्र, नवनाथ विद्यालय, श्री नवनाथ युवा मंडळाचा संयुक्त उपक्रम

विद्यार्थी, युवक-युवती, ग्रामस्थांनी केली योगासने

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नेहरु युवा केंद्र, नवनाथ विद्यालय, श्री नवनाथ युवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. नवनाथ विद्यालयाच्या मैदानावर शालेय विद्यार्थ्यांना योगाचे धडे प्रात्यक्षिकासह देण्यात आले. योग दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थी, युवक-युवती, ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


या योग शिबीरात डॉ. सुनिल गंधे यांनी उपस्थितांना योग व प्राणायमाचे धडे दिले. विविध आसन प्रात्यक्षिकासह करुन, त्याचे महत्त्व विशद केले. तर योग, प्राणायम व ध्यान धारणेबद्दल माहिती देवून निरोगी जीवनासाठी योग व प्राणायाम करण्याचे त्यांनी आवाहन केले. तसेच आरोग्यासाठी आहारात आवश्यक असलेल्या हिरवे पालेभाज्या, फळ याचे महत्त्व विशद केले. क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार यांनी देखील विविध आसनाचे प्रात्यक्षिक करुन विद्यार्थ्यांकडून आसने करुन घेतली. यावेळी नवनाथ विद्यालयाचे मुख्यध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, नेहरु युवा केंद्राचे तालुका प्रतिनिधी वैभव हिरवे, निळकंठ वाघमारे, शुभांगी धामणे, सुवर्णा जाधव, उत्तम कांडेकर, भानुदास लंगोटे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे, प्रियंका डोंगरे-ठाणगे आदी उपस्थित होते.


पै.नाना डोंगरे यांनी निरोगी जीवनासाठी योग व प्राणायाम महत्त्वाचा आहे. गावाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी प्रत्येकाने व्यायाम व योग करण्याची गरज आहे. भारताने संपूर्ण जगाला योगची देणगी दिली असून, योगाने सक्षम सदृढ पिढी निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा उपनिदेशक शिवाजी खरात यांने मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *