तंबाखू विरोधी सेवन दिनानिमित्त ग्रामस्थांना व्यसनमुक्तीची शपथ
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि श्री नवनाथ युवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती जागतिक तंबाखू विरोधी सेवन दिनाचा जागर करीत साजरी करण्यात आली. निमगाव वाघा (ता. नगर) येथे ग्रामस्थांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक मधुकर साबळे, सुरेश खामकर, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, भाऊसाहेब जाधव, हरीभाऊ पुंड, जालिंदर जाधव, दत्ता शिंदे, शासनाचा आदर्श युवती पुरस्कार प्राप्त मंदाताई डोंगरे, बापू सुंबे, मेजर कैलास जाधव, वाचनालयाच्या उपाध्यक्षा तथा एनआयएस प्रियंका डोंगरे-ठाणगे, किरण ठाणगे आदी उपस्थित होते.

पै.नाना डोंगरे म्हणाले की, समाजात वाढत चाललेली व्यसनाधिनता कमी होण्यासाठी व तंबाखूच्या दुष्परिणामाची जनजागृती होणे आवश्यक आहे. समाजाच्या उध्दारासाठी अनेक महान व्यक्तींनी योगदान दिले असून, युवक मात्र व्यसनाच्या आहारी जाऊन आपल्या कुटूंबासह समाजाचे नुकसान करीत आहे. युवक हे देशाचे बलस्थान असून, त्यांनी आपल्या महापुरुष व थोर व्यक्तीमत्वांचा आदर्श घेण्याची गरज आहे. अहिल्यादेवी होळकर हे सक्षम स्त्रीचे मुर्तीमंत उदाहरण आहेत. त्या आदर्श प्रशासक होत्या. अनिष्ट रुढी परंपरांना फाटा देऊन त्यांनी महिलांना समाजात आदराचे स्थान मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांचे मार्गदर्शन लाभले.