झुंड मधून झोपडपट्टीतील मुलांचा संघर्ष समोर येऊन चळवळीला बळ मिळाले -विजय बारसे

अहमदनगर (प्रतिनिधी)- झुंड सिनेमात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ज्यांचे व्यक्तिमत्व साकारले व ज्यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारलेला आहे, असे स्लम सॉकर चळवळीचे प्रणेते विजय बारसे यांचा शहरात ख्रिश्चन एकता मंचच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. ख्रिश्चन एकता मंचचे जिल्हाध्यक्ष प्रा. संदीप वाघमारे व युवाजिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला. तारकपूर येथील पवित्र तारकांची मंडळी येथे जॉन खरात यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार संग्राम जगताप, रेव्ह. डी.डी. सोनवणे, अॅाड. योहान मकासरे, दिवाकर वाघमारे, संदेश बोर्डे, ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके, सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विजय बारसे म्हणाले की, झोपडपट्टीतील मुलांच्या संघर्षमय जीवनात जिद्द व आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य फुटबॉल खेळातून केले आहे. झुंड या सिनेमातून त्यांचा संघर्ष समाजा समोर आला असून, त्यांच्या चळवळीला बळ मिळाले. प्राध्यापक असताना महाविद्यालय शेजारी असलेल्या झोपडपट्टीतील मुलांच्या जीवनाचा संघर्ष व वर्तन जवळून पाहता आले. चोरी करणे व व्यसनाच्या आहारी गेलेल्या या मुलांमध्ये फुटबॉल खेळाची आवड निर्माण करण्यासाठी स्लम सॉकर या चळवळीचा उदय झाला. फुटबॉल खेळताना अशा विद्यार्थ्यांच्या जीवनात मोठा बदल घडून अनेक मुले विधायक मार्गाला लागल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, सध्याचे चित्रपट हे समाज जागृतीचे कार्य करत आहे. पूर्वी चित्रपट हा मनोरंजनाचा भाग होता, मात्र सध्या चित्रपट निर्माते देखील सामाजिक विषय उत्तमपणे चित्रपटाच्या माध्यमातून मांडत आहे. झुंड हा चित्रपट समाजाला दिशादर्शक ठरत असून, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा देऊन, त्यांना समाजात उभे करण्याचा संदेश या चित्रपटातून देण्यात आला असल्याचे स्पष्ट करुन, बारसे यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. डॉ. सुरेश पठारे यांनी सेवाभाव हा ख्रिस्ती समाजाची अस्मिता आहे. देवाची उपासना फक्त धार्मिक स्थळातून होते, असे नव्हे सर्वसामान्यांच्या सेवेतूनही देवाची उपासना होत असल्याचे त्यांनी सांगितले. सुधीर लंके म्हणाले की, ज्यांना समाजाने टाकून दिले, त्यांच्यासाठी विजय बोरसे यांनी चळवळ चालवली. व्यवस्थेने नाकारलेल्या झुंडीला एक शिस्त लावून त्यांच्यात संघर्ष करण्याची हिंमत व जिद्द त्यांनी निर्माण केली. समाजात अशा अनेक झुंडी आहेत, त्यांना शिस्त लावण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रेव्ह. जे. डी. वाघमारे यांनी कार्यक्रमाची सुरवात प्रार्थनेने केली. ख्रिश्चन एकता मंचचे जिल्हाध्यक्ष प्रा. संदीप वाघमारे, युवा जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, अहमदनगर पहिली मंडळीचे खजिनदार सॅम्युअल खरात यांनी विजय बारसे यांचा सत्कार केला. नव्याने दिक्षा झालेले रेव्ह. बिपीन गायकवाड, रेव्ह.डॉ. प्रकाश बनसोडे, रेव्ह. जोसेफ वैरागर, पा. अशोक पाडळे, सिस. घोरपडे आदी सेवकांचा सत्कार करण्यात आला. तसेच विजय काकडे, सुयोग बनसोड, रवींद्र ठोंबरे, सुशांत म्हस्के, सुभाष भिंगारदिवे, विक्रम गायकवाड यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप वाघमारे यांनी केले. आभार श्याम वैरागर यांनी मानले. पा. जोसेफ वैरागर यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. रेव्ह. डी. डी. सोनवणे यांनी आशिर्वादित केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ख्रिश्चन एकता मंचच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.