वाढीव अर्धा तास मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- आजपासून शुक्रवारी (दि.4 मार्च) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने घेण्यात येणार्या एचएससी बारावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली. इंग्रजी विषयाच्या पेपरने परीक्षेला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण झाले असताना विद्यार्थ्यांना लेखणाची सवय राहिली नसल्याने यावर्षी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना वाढीव अर्धा तास देण्यात आला होता. 438 केंद्रावर ही परीक्षा होत असून, विद्यार्थ्यांची शाळाच परीक्षा केंद्र असल्याने परीक्षा केंद्रावर जास्त गर्दी दिसून आली नाही.
माध्यमिक शिक्षक विभागाने परीक्षेची सर्व तयारी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान तपासून त्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडण्यात आले. विद्यार्थ्यांना मास्क सक्तीचे करण्यात आले होते. लेखणासाठी वाढीव अर्धा तास मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी सात भरारी पथकांद्वारे परीक्षेवर लक्ष ठेवण्यात आले आहे. यंदा 64 हजार 497 विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहे. 15 पेक्षा कमी परीक्षार्थी असलेल्या 25 शाळांमधील विद्यार्थ्यांना जवळच्या परीक्षा केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी झालेल्या इंग्रजीच्या पेपरसाठी व्हिडिओ चित्रीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. 14 मार्चला होणार्या गणिताच्या पेपरला देखील व्हिडिओ चित्रीकरण होणार आहे. तर प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.