प्रसाद मांढरे यांनी स्विकारली अध्यक्षपदाची सूत्रे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात मागील 31 वर्षापासून सामाजिक योगदान देणारे लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा सेवा कार्याचा संकल्प करुन पार पडला. लायन्स मिडटाऊनचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसाद मांढरे, सचिव संदीपसिंग चव्हाण, खजिनदार डॉ. संदीप सांगळे तर सहसचिव नरेंद्र मुळे व माधवी मांढरे आदींसह पदाधिकाऱ्यांना पदाची सूत्रे प्रदान करण्यात आली.
लायन्सचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर राजेश अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी इंडक्शन ऑफिसर राजेंद्र गोयल, रिजन चेअरपर्सन आशिष बोरावके, झोन चेअरपर्सन सुमित भट्टड, अनिल कटारिया, संदीप सांगळे, डॉ. कल्पना ठुबे, शोभा भलसिंग, संतोष मानकेश्वर, संपूर्णा सावंत आदींसह लायन्सचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी लायन्स मिडटाऊन क्लबचे संस्थापक अध्यक्ष स्व. श्रीकांत मांढरे व माजी अध्यक्षा स्व. राजश्री मांढरे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. अनिल कटारिया यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. शोभा भलसिंग यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अनुष्का मांढरे यांनी फ्लॅग होस्टिंग केले.
प्रसाद मांढरे यांनी सेवेचा संकल्प सिद्धीस घेऊन जाऊन लायन्सच्या माध्यमातून वंचितांना आधार दिला जाणार आहे. पर्यावरण, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन विशेषत: महिला सक्षमीकरण आणि स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी विशेष कार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर मागील वर्षाचा अहवाल सादर करून भविष्यात राबविण्यात येणाऱ्या सामाजिक कार्याची माहिती त्यांनी दिली.
राजेश अग्रवाल यांनी नूतन पदाधिकारी यांना कर्तव्याची जाणीव करून देऊन, पदग्रहणाची शपथ दिली. तर त्यांच्या कार्याची जबाबदारी समजावून सांगितली. अग्रवाल म्हणाले की, पुढील शंभर वर्षाचा विचार करून लायन्स क्लब दूरदृष्टीने समाज कार्य करत आहे. मोठे कार्य उभे करण्यासाठी सक्रिय सभासद जोडा. मोठे प्रकल्प राबवा, यासाठी इंटरनॅशनल लायन्सच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी देखील उपलब्ध होणार आहे. सेवा फक्त तात्पुरती नसून, कायम स्वरुपी प्रकल्पांवर भर देण्याचे त्यांनी आवाहन केले.
राजेंद्र गोयल म्हणाले की, शहरात उत्तम प्रकारे लायन्स मिडटाऊनचे कार्य सुरू आहे. वंचित, दुर्बल घटकांना आधार देण्याचे काम केले जात आहे. शहरात सर्वात जुना क्लब असलेल्या या लायन्स मिडटाऊनने सेवाभाव रुजवून लायन्स चळवळ वृध्दींगत केली असल्याचे त्यांनी सांगितले. या पदग्रहण सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.