• Wed. Feb 5th, 2025

शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांच्या भरतीसाठी जिल्हा परिषद शिक्षकांचा समावेश करावा

ByMirror

May 18, 2022

या सरळ सेवा भरती प्रक्रियेतून जिल्हा परिषद शिक्षकांना अपात्र ठरवणे अन्यायकारक -बाबासाहेब बोडखे


महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे ग्रामविकास मंत्री व ग्रामविकासच्या अप्पर मुख्य सचिवांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख या पदांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे होणार्‍या भरती प्रक्रियेत जिल्हा परिषद शिक्षकांचा समावेश करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.


महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक अतिशय दुर्गम भागात वाडी-वस्तीवर अतीशय प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहे. शिष्यवृत्ती सारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये ग्रामीण महाराष्ट्र आपला ठसा उमटवताना दिसत आहे. 10 जून 2014 ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र तांत्रिक सेवा वर्ग 3 मधील विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख या पदावर भरतीचे निकष देण्यात आलेले आहेत. सद्यस्थितीत महाराष्ट्रातील जिल्हा परिषद मध्ये शिक्षण विस्ताराधिकारी 50 टक्केपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर केंद्रप्रमुख 70 टक्के पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. प्रशासन व्यवस्थेमध्ये ही महत्त्वाची दोन पदे रिक्त असल्यामुळे शिक्षण विभागातील प्रशासन, नियंत्रण, प्रशिक्षण आणि शालेय मूल्यमापनावर प्रचंड प्रमाणात ताण येत आहे.


अधिसूचनेनुसार विस्तार अधिकारी पदे सरळसेवा (नामनिर्देशन) 25 टक्के, विभागीय स्पर्धा परीक्षा (निवडप्रक्रिया) 25 टक्के, पदोन्नती 50 टक्के याप्रकारे सेवाप्रवेश निकष आहेत. सदर सन 2014 च्या अधिसूचनेनुसार नामनिर्देशन व विभागीय परीक्षा यामधील 50 टक्के पदावर भरती प्रक्रिया झाली नसल्याने मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
5 मे 2022 चे अप्पर सचिव ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या पत्रानुसार शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखची सरळ सेवा भरती करण्यासाठी सूचित केले आहे. त्यामुळे गुणवत्ताधारक शिक्षकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. पण 10 जून 2014 च्या अधिसूचनेनुसार सेवा सरळ सेवा भरती प्रक्रियेतून फक्त जिल्हा परिषद शिक्षकांना परीक्षेकरिता अपात्र ठरविण्यात आले आहे. हा पात्रताधारक जिल्हा परिषद शिक्षकांवर खुप मोठा अन्याय आहे. तसेच 2014 पासून एकदाही परीक्षा झाली नसल्याने पात्र उमेदवारांना वयामध्ये सवलत मिळावी. 10 जून 2014 च्या अधिसूचनेत योग्य ते बदल करुन पात्रताधारक जिल्हा परिषद शिक्षकांना पात्र ठरवावे व वयात सवलत देऊन शक्य तितक्या लवकर सरळसेवा स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरती करण्याची मागणी शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *