जय भवानी… जय शिवाजी… च्या जयघोषाने अवघे नगर दुमदुमले

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
हातात व वाहनांवर असलेले भगवे ध्वज, चौका-चौकात लावण्यात आलेले जोशपूर्ण पोवाडे, भगवे फेटे बांधलेले युवक-युवती व जयंती उत्सवात अवतरलेले बाल-शिवाजी यांनी सर्वांचे लक्ष वेधले. जय भवानी… जय शिवाजी… च्या जयघोषाने अवघे नगर दुमदुमले

जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्या समोर शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, आमदार संग्राम जगताप, आयुक्त शंकर गोरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, युवक-युवतींसह महिला देखील मोठ्या संख्येने हजर होत्या.

महापालिकेच्या वतीने जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित राज्यस्तरीय महापौर चषक सायकल स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप व महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संभाजी कदम, सुरेखा कदम, अनिल शिंदे, गणेश कवडे, सचिन शिंदे, श्याम नळकांडे आदी उपस्थित होते. तसेच शहरातील चौकाचौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
