विविध भागात बैठका घेऊना नागरिकांशी शहराच्या विकासात्मक मुद्दयांवर व प्रश्नांवर चर्चा
आम आदमी पार्टीने विकास हाच अजेंडा घेऊन राजकारण केले -प्रा. अशोक डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या विकासात्मक मुद्दयांवर व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने स्वराज्य संवाद यात्रेचे प्रारंभ करण्यात आले. शहर व उपनगरातील विविध भागात आपच्या पदाधिकार्यांनी संवाद बैठका घेऊन शहराच्या विविध प्रश्न व विकासाबाबत चर्चा केली. तर नागरिकांच्या मनातील भावना जाणून घेऊन आपच्या वतीने दिल्लीच्या धर्तीवर करण्यात आलेल्या विकासाची माहिती देण्यात आली.
सावेडी येथील पारिजात चौकातून स्वराज्य संवाद यात्रेचे प्रारंभ झाले. यावेळी शहर जिल्हा संघटक प्रा. अशोक डोंगरे, कार्याध्यक्ष भरत खाकाळ, राजेंद्र कर्डिले, गौतम कुलकर्णी, अॅड. सौ. शिंदे, दिलीप घुले, गणेश मारवाडी, संपत मोरे, रवी सातपुते, प्रकाश फराटेया आदींसह नागरिक उपस्थित होते.
प्रा. अशोक डोंगरे म्हणाले की, आम आदमी पार्टीने विकास हाच अजेंडा घेऊन राजकारण केले आहे. जातीय राजकारणाला पर्याय देण्यासाठी केंद्र व राज्यात आपने पर्याय उभा केला आहे. दिल्लीत शिक्षण, व्यापार, आयटी व उद्योग क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. अनेक खर्चिक सोयी-सुविधा नागरिकांना तेथे मोफत मिळत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात ही व्यवस्था व विकास दिसत नसून, येथे फक्त जातीय राजकारण सुरु आहे. विकास साधण्यासाठी जनतेने आपकडे सत्तेची सूत्र देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्याध्यक्ष भरत खाकाळ यांनी आम आदमी पार्टीच्या वतीने पंढरपूर या ठिकाणापासून रायगड पर्यंत निघालेल्या स्वराज्य स्वराज्य यात्रेला लाभलेल्या जनतेच्या प्रतिसादाची माहिती दिली. तर दिल्ली आणि पंजाबमध्ये आपच्या वतीने विविध ठिकाणी संवाद यात्रा घेऊन सर्वसामान्य नागरिकांना जोडण्याचे काम करण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच दिल्लीगेट, प्रोफेसर चौक, भिस्तबाग चौक व गुलमोहर रोड येथे झालेल्या स्वराज्य संवाद यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.