• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

विद्यार्थ्यांना सायबर क्राईम व मुलींची छेडछाड प्रतिबंधाविषयी मार्गदर्शन

ByMirror

Oct 8, 2022

रुपीबाई मोतीलाल बोरा विद्यालयात भरोसा सेलचे व्याख्यान

अन्याय व गुन्हेगारी वृत्तीचा बिमोड केल्यास समाज सुरक्षित होणार -पल्लवी देशमुख

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रुपीबाई मोतीलाल बोरा उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर क्राईम व मुलींची छेडछाड प्रतिबंधासाठी व्याख्यान देण्यात आले. दामिनी पथकाचे भरोसा सेल अंतर्गत मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुला-मुलींना सायबर क्राईम विषयी जागृती करुन मुलींची छेडछाड रोखण्यासाठी आवाहन करण्यात आले.


विद्यालयाचे प्राचार्य अजयकुमार बारगळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी भरोसा सेलच्या प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी देशमुख उपस्थित होत्या. प्रास्ताविकात हिंदी विषय अध्यापक सोमनाथ नजान यांनी शाळेत मुला-मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने सुरु असलेल्या उपक्रमाचा आढावा घेतला.


सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी देशमुख म्हणाल्या की, मुलीं व स्त्रियांच्या अत्याचारामध्ये वाढ होत असून, ते रोखण्यासाठी जागृक नागरिक म्हणून पुढे येण्याची गरज आहे. अन्याय व गुन्हेगारी वृत्तीचा बिमोड केल्यास समाज सुरक्षित होणार आहे. आपल्या घरातील आई, बहिण व महिला सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने महिलांचा सन्मान करण्याचे त्यांनी आवाहन केले. तर छेडछाड प्रकरणाला प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शन केले. मुलींची छेडछाड प्रतिबंधासाठी दामिनी पथक, भरोसा सेल व दिलासा पथकाच्या कार्याची व्याप्ती सांगितली. मुलींनी देखील स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण घेऊन सक्षम होण्याचे त्यांनी सांगितले.

या व्याख्यानात विद्यार्थ्यांना सायबर क्राईमला बळी न पडता. त्याबद्दल माहिती देण्यात आली.
प्राचार्य अजयकुमार बारगळ यांनी विद्यालयात मुलींच्या सुरक्षेसंदर्भात अधिक महत्त्व दिले जात असून, मुलींना निर्भयपणे शिक्षण कसे घेता येईल? या विषयी काळजी घेतली जात असल्याचे स्पष्ट केले. यावेळी पोलीस निरीक्षक देशमुख यांच्यासह भरोसा सेलचे सहकारी हवालदार पोकळे, नाईक कोळेकर, सौ. माळी यांचा सत्कार करण्यात आला. मुलींनी काही अडचण असल्यास दामिनी पथकाचे टोल फ्री नंबर 112 किंवा निर्भया पथकाचा मोबाईल नंबर 9370903143 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *