राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्या उध्दारासाठी कार्य केले -अभिषेक कळमकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्या उध्दारासाठी कार्य केले. शिक्षणाची दूरदृष्टी ठेवून प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. वस्तीगृह संकल्पना अस्तित्वात आनली. त्यांचा आदर्श समोर ठेऊन विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात नेहमी अद्यावत राहण्याचे आवाहन माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध स्पर्धा परीक्षेतील राज्य व जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत चमकलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी माजी महापौर कळमकर बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, विभागीय अधिकारी टी.पी. कन्हेरकर, शाळा व्यवस्थापन समितीचे विष्णुपंत म्हस्के, शामराव व्यवहारे, माजी विस्तार अधिकारी भोर, विश्वासराव काळे, माध्यमिकचे प्राचार्य एस.एल. ठुबे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे कळमकर म्हणाले की, शालेय जीवनातूनच भविष्यातील स्पर्धा परीक्षांचा पाया रचला जातो. रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना दिशा दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक शिवाजी लंके यांनी शाळेतील वाढलेल्या गुणवत्तेचा आलेख सादर करुन मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत सर्वात जास्त लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत चमकले असल्याचे स्पष्ट केले. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचे मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत चार तर जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत 43 विद्यार्थी चमकले. तर माध्यमिक विद्यालयाचे एनएमएमएस व सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रत्येकी तीन विद्यार्थी, इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत दहा व इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पंधरा विद्यार्थ्यांसह मंथन प्रज्ञाशोध व सी.व्ही. रमन बालवैज्ञानिक परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गगनभरारी या चौदाव्या शालेय वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विद्या बिडवे व विलास बिडवे यांना या वर्षीचा आदर्श कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 5 हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह, शाल व पोषाख असे पुरस्काराचे स्वरुप होते.
ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, परिवर्तनवादी चळवळीला शाहू महाराजांनी दिशा दिली. दूरदृष्टी असलेल्या राजाने बहुजन समाजातील प्रश्न सोडविण्याचे काम केले. शेतकर्यांचे प्रश्न सोडवले व त्याकाळी रोजगार हमीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. समाजाच्या सुख-दुःखाशी जोडला गेलेला हा राजा होता, असे त्यांनी सांगितले. दादाभाऊ कळमकर यांनी विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रा.एस.एल. ठुबे म्हणाले की, शाहू महाराजांनी सर्व समाजात समता प्रस्थापित करण्याचे काम केले. मानवतावादी दृष्टीकोन समोर ठेवून बहुजन समाजाचे त्यांनी नेतृत्व केले. तर पुरोगामी विचार त्यांनी दिल्याचे स्पष्ट करुन शाळेतील स्पर्धा परीक्षेच्या गुणवत्तेने त्या शाळेच्या गुणवत्तेचे मूल्यमापन ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता पिसाळ व सुजाता दोमल यांनी केले. आभार उर्मिला साळुंके यांनी मानले.