लोककलेच्या सादरीकरणातून सामाजिक संदेश
कौशल्यपूर्ण कलात्मक शिक्षण काळाची गरज -कावेरी कैदके
अहमदनगर (प्रतिनिधी)- कौशल्य प्रशिक्षणातून करिअर घडविता येते. कौशल्यपूर्ण कलात्मक शिक्षण हे आजच्या काळातील गरज आहे. युवा वर्गाने शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच आपल्या आवडत्या क्षेत्रातील कौशल्य आत्मसात केल्यास जीवनाला कलाटणी मिळून रोजगार मिळू शकतो, असे प्रतिपादन सौंदर्यशास्त्रतज्ञ कावेरी कैदके यांनी केले.
युवा नेतृत्व प्रशिक्षण व समुदाय विकास शिबिर उपक्रमांतर्गत भीमा गौतमी वसतीगृहात झालेल्या कौशल्य प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना कैदके बोलत होत्या. यावेळी गायत्री मेक ओव्हरच्या संचालिका गायत्री गुंड, अहिल्या फाउंडेशनच्या सुवर्ण कैदके, जय युवाच्या जयश्री शिंदे, उडाण फाऊंडेशनच्या आरती शिंदे, रजनी जाधव, अश्विनी वाघ आदींसह युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पुढे कैदके म्हणाल्या की, आजच्या काळात बेरोजगारीवर मात करण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमाला कलात्मक शिक्षणाची जोड द्यावी लागणार आहे. यामुळे युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होणार आहे. सौंदर्यशास्त्रामध्ये अनेक अत्याधुनिक पद्धतीचा प्रशिक्षणाच्या संधी युवतींना आहे. स्वयंरोजगारासाठी युवतींना सौंदर्यशास्त्र प्रशिक्षण हा प्रभावी मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
गायत्री गुंड यांनी सौंदर्यशास्त्र महिलांसाठी उत्तम असे करिअरचे माध्यम आहे. काळानुरूप आपल्या शहरातच अत्याधुनिक प्रशिक्षण उपलब्ध होत आहे. सातत्य नवीन शिकण्याची आवड, कष्ट करण्याची तयारी व आत्मविश्वास ठेवल्यास व्यवसायात यश मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रशिक्षणात कावेरी कैदके यांनी एकाच वेळी तीस युवतींचे प्रात्यक्षिकासह विविध हेअर कट करून दाखविले. तर बेसिक ब्युटी पार्लरचे मोफत प्रशिक्षण दिले. गायत्री गुंड यांनी मेहंदी डिजाइनचे प्रात्यक्षिकासह युवतींना धडे दिले.

शिबिराच्या दुसर्या सत्रात पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता. लोपपावत चाललेल्या लोककलेबद्दल शाहीर कान्हू सुंबे यांनी माहिती दिली. यावेळी शाहीरी, वाघ्या मुरळी, बहुरूपी, गण-गवळण आदी लोककलेचे कारभारी वाजे, रावसाहेब भालेराव, गोरक्षनाथ पवार, बंडू भालेराव, नंदाबाई साबळे यांनी सादरीकरण केले. तर लोककलेच्या माध्यमातून युवतींना सामाजिक संदेशही दिले.
प्रगती फाउंडेशनच्या महिला बचत गट मंडळाच्या सदस्यांनी शिबिरार्थींशी प्रत्यक्ष संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले. आभार दिनेश शिंदे यांनी मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी अॅड. सुनील तोडकर, नेहरु युवा केंद्राचे शिवाजी खरात, पोपट बनकर, सागर अलचेट्टी, अमोल तांबडे, जयेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
